Nandurbar Crime News : फत्तेपूर (ता. शहादा) येथील २८ वर्षीय तरुणाचा पूर्ववैमनस्यातून आमोदा मडकानी रस्त्यावरील शिव मंदिराजवळ मारहाण करून खून केल्याची घटना घडली. या घटनेत इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी सुमारे १२ ते १५ संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ( One killed in grudge attack )
त्यापैकी एकाला अटक केली असून, उर्वरित फरारी आहेत. दरम्यान, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उशिरा मृतावर फत्तेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास फत्तेपूर येथील विकास पटले, अनिल वळवी व सावन पवार हे दुचाकीने आमोदा ते मडकानी दरम्यानच्या शिव मंदिराजवळ आल्यानंतर तेथे पवन चौधरी, जीवन चौधरी यांच्यासह इतर सात-आठ जण बसलेले होते.
या सर्वांनी सावन पवार व त्याच्या सोबत असलेल्यांना फायटर, चाकू, लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर या सर्वांनी या तिघांना विनाक्रमांकाच्या बोलेरो वाहनात बसवून मडकानी येथील विकास पवार यांच्या घरासमोरील चौकात सार्वजनिक ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत मारहाण करणारे संशयित फरारी झाले होते. या मारहाणीत सावन पवार याच्या डोके, गळा व पोटावर गंभीर दुखापत झाली.
त्याच्यासह इतर दोघांना दुखापत झाली होती. तिन्ही जखमींना पोलिसांनी पोलिस गाडीतून तिघांना उपचारासाठी म्हसावद रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिघांची परिस्थिती चिंताजनक असल्याने नंदुरबारला नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सावन पवार याचा १३ जूनला सकाळी मृत्यू झाला. ही माहिती समजताच त्याच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पवार यांच्या पार्थिवावर शवचिकित्सा झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह म्हसावद पोलिस ठाण्यात आणण्यात आला. सर्व आरोपींना अटक होईपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत पोलिस ठाण्यावरच ठिय्या धरणे आंदोलन सुरू केले होते.
घटनेचा पारदर्शी तपास ः तांबे
अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधीक्षक दत्ता पवार, शहाद्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर, म्हसावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी जमावाला सामोरे जात याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच पोलिसांतर्फे अटक केली जाईल. संपूर्ण घटनेचा पारदर्शी तपास केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमावाने मृतदेह ताब्यात घेत सायंकाळी उशिरा फतेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बारा जणांवर गुन्हा दाखल
विकास सांगा पटले (रा. फत्तेपूर) याच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलिस ठाण्यात पवन होमसिंग चौधरी, जीवन होमसिंग चौधरी, मोहन सोमा चौधरी, विकास विष्णू पवार (सर्व रा. मडकानी), संदीप संजय वळवी (रा. आमोदा) व इतर सात अशा बारा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. यापैकी संदीप संजय वळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित सर्व फरारी आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे तपास करीत आहेत.
दोन्ही गावांत बंदोबस्त
बुधवारी रात्री घटना घडल्यानंतर पोलिसांनी फत्तेपूर व मडकानी या दोन्ही गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावला होता. घटनेचे पडसाद इतरत्र उमटू नये यासाठी दक्षता बाळगत रात्रीपासूनच संशयित आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली होती. मळ्यात सावन पवार व मुख्य संशयित पवन चौधरी या दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होता, त्या वादातूनच हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत गावात पेट्रोलिंग करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.