Nandurbar News : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभागामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाइकची निर्मिती करण्यात आली आहे. ही आपत्ती नियंत्रण फायर बाइक छोट्या स्वरूपातील आगीच्या नियंत्रणासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी शनिवारी (ता. १३) येथे केले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाइकच्या वितरण समारंभात ते बोलत होते. ()
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार आमश्या पाडवी, ॲड. के. सी. पाडवी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की जेथे दाट वस्ती आहे, अशा ठिकाणी पालिकेची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मोठी गाडी जाण्यासाठी, पोचण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. परंतु आपत्ती व्यवस्थापनाची तत्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाइक अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. या बाइकवर २०० लिटर पाण्याचे दोन टॅंक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे २०० लिटर लिक्विड फोमचे टॅंक असणार आहे.
दोन महिन्यांत राज्यात केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लिक्विड फोम असलेल्या फायर बाइकसोबतच मोठ्या वाहनांचेही वितरण केले जाणार असून, अशा प्रकारे फायर बाइकचे वितरण राज्यात सर्वप्रथम दुर्गम जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात ५० फायर बाइकची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील नऊ फायर बाइक आज नंदुरबार येथे वितरित करण्यात येत असून, त्यातील चार नंदुरबार नगर परिषद, दोन शहादा नगर परिषद, धडगाव, नवापूर व तळोदा येथे प्रत्येकी एक फायर बाइक वितरित करण्यात येत असल्याचेही या वेळी पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
आपत्कालीन फायर बाइकविषयी...
ही जलद प्रतिसाद आणीबाणी अग्निशमन बाइक जेथे मोठा फायर ट्रक प्रवेश करू शकणार नाही, अशा भागात आग विझवण्यासाठी लक्षणीय डिझाइन केलेली आहे. इंजिनद्वारे चालणाऱ्या या वाहनात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यांना सिलिंडरची आवश्यकता नाही. वापराचे स्वरूप सुनिश्चित करून ऑपरेशनदरम्यान टाक्या पुन्हा भरल्या जाऊ शकतात. सायरन आणि हूटरने सुसज्ज, अगदी दाट लोकवस्तीच्या भागात, बाइकमध्ये नेव्हिगेशन सुलभ करण्यासाठी आपत्कालीन दिवेदेखील आहेत.
ही वैशिष्ट्ये जलद प्रतिसादाबरोबरच जेथे पोचणे कठीण आहे, अशा भागात त्यामुळे या बाइकचा प्रवेश सुलभ होईल. त्यामुळे बचाव मोहिमेचा प्रभाव आणि सुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढते. ही अत्यंत विश्वासार्ह बाइक अरुंद गल्ल्यांमधील आगीचा सामना करण्यासाठी योग्य आहे आणि इतर आपत्कालीन आणि अग्निसुरक्षा प्रतिसाद पथकांद्वारे तिचा वापर केला जाऊ शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.