Nandurbar News : मे महिना संपत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाचे वेध लागले आहेत. खरिपाच्या नियोजनासाठी कृषी विभागही सरसावला आहे. यंदा जिल्ह्यात दोन लाख ८० हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाने खते-बियाणे उपलब्ध करून नियोजन केले आहे. जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात ६० टक्के खते-बियाणे उपलब्ध होणार आहे. (Nandurbar Kharif will be sown on 2 lakh 74 thousand hectares this year)
रब्बीचा हंगाम संपताच शेतकरी आग ओकणाऱ्या उन्हातही खरिपासाठी शेती मशागतीचे कामे करत आहेत. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता ग्रामीण भागात शेतकरी उर्वरित तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या कामात गुंतलेले कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारीही आपापल्या खरिपाच्या नियोजनात गुंतले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात बागायतीपेक्षा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले क्षेत्र अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार केल्यास नंदुरबारसह तळोदा व शहादा या तीन तालुक्यांत बागायती क्षेत्र जास्त आहे. अक्कलकुवा, नवापूर व धडगाव या तालुक्यात पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. त्यामुळे कृषी विभागाने त्या त्या तालुक्यातील पीकपाणी परिस्थितीनुसार बियाणे व खते उफलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले.
जिल्ह्यात आगात म्हणजेच मे महिन्यात कापूस लागवडीस सुरवात केली जाते. विहिरी-कूपनलिकांना पाणी असलेले शेतकरी मे महिन्यात कापूस लागवड सुरू करतात. मात्र सध्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता ४२ अंशांवर गेली होती. ते वातावरण लागवडीस धोकादायक असल्याने शेतकरी अद्याप कापूस लागवडीकडे वळलेले नाहीत. मात्र पपई लागवड बऱ्यापैकी उरकली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी दोन लाख ७४ हजार हेक्टर इतके आहे. दर वर्षी त्यापेक्षा अधिक क्षेत्रात खरिपाची पेरणी केली जाते. या वर्षीही दोन लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन असले तरी त्यापेक्षा जास्तही पेरणी होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक राहण्याचा अंदाज असून, त्याखालोखाल सोयाबीन, मका, भात राहणार आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा या तालुक्यांत सर्वाधिक बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी सर्वाधिक कापूस लागवड करीत असतात. एकूण कपाशी क्षेत्रापैकी या तीन तालुक्यांचा वाटा ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असतो.
जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा हे दोन तालुके, तर नवापूर काहीअंशी कोरडवाहू शेतीचा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पावसाळी पिकेच घेतली जातात. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात उतारावरील शेती असून, तेथे मका, उडीद, मूग, तूर यांचे क्षेत्र अधिक असते. यंदाही या चार पिकांवर अधिक भर राहणार आहे. भात पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कापसाचे क्षेत्र यंदाही जवळपास एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाचे नियोजन पूर्ण
कृषी विभागाने नियोजन पूर्ण करून आवश्यकतेप्रमाणे बियाणे व खतांची मागणी शासनाकडे व बियाणे व खते उत्पादनक कंपन्यांकडे नोंदविली आहे. त्यानुसार महाबीज व इतर खासगी कंपन्यांमार्फत बियाण्यांची उपलब्धता झाली आहे. बीटी कापूस वाणाची पाकिटे सर्वाधिक व पुरेशी मिळणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी एकाच वाणाची मागणी करू नये, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.