म्हसदी : स्वातंत्र्यानंतर सतत काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात सरळ लढत अटळ आहे. घराणेशाहीवर चौफेर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना मात्र येथे काहीसा छेद दिला जात आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)
एकीकडे हॅट्ट्रीकच्या तयारीतील डॉ. हीना गावित व राजकारणाच्या दमदार एन्ट्रीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या अॅड. गोवाल पाडवी यांच्या विजयासाठी दोघांचे पिता जिवाचे रान करत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल पाहता भाजपसाठी साक्री, शिरपूर आणि नवापूर मतदारसंघात घटलेली मते चिंतेचा विषय मानला जात आहे.
नंदुरबारची यंदाची लढत काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी व भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यात होत आहे. दोन्हींच्या पित्यांसाठी ही खरी कसोटी ठरणार आहे. डॉ. हीना गावित यांचे वडील आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित व अॅड. गोवाल पाडवी यांचे वडील माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचा नंदुरबार जिल्ह्यावर कायम वरचष्मा राहिला आहे.
मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री हे तालुके नंदुरबारला जोडले गेल्याने या मतदारसंघाचे विजयाचे गणित पार बदलून गेले आहे. गेल्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये डॉ. हीना गावित यांना शिरपूर आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघाने मोठा आधार दिला आहे. मात्र साक्री आणि शिरपूर मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटत गेले आहे. (Latest Marathi News)
शिरपूर तालुक्यात २०१९ मध्ये परिस्थिती वेगळी होती. शिरपूरचे काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, साक्रीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते काँग्रेसमध्ये होते. मध्यंतरीच्या काळात राजकारणातील उलथापालथीत दोघांनी भाजपची वाट धरली. डॉ. हीना गावित यांना शिरपूरमध्ये हक्काच्या मतदारांबरोबरच अमरिशभाई पटेल यांची साथ मिळणार आहे.
साक्री तालुक्यात शिवाजीराव दहिते, ज्येष्ठ नेते सुरेश रामराव पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते, युवानेते चंद्रजित पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी डॉ. हीना गावित यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे अॅड. के. सी. पाडवी यांना गेल्यावेळी साक्रीत मताधिक्य वाढले होते.
मात्र शिरपूरमध्ये मताधिक्य घटले होते. गेल्या वेळची स्थिती पाहता मोदी लाटेचा करिष्मा होता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यंदा मात्र तसे काहीही नाही. महायुतीकडे अनेक राजकीय पक्षाचे पाठबळ आहे, तर काँग्रेस पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक विलक्षण, रंगतदार ठरणार असल्याचे चित्र आहे.
पित्यांचीच सत्त्वपरीक्षा!
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही उमेदवारांच्या पित्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून, उभयतांनी अनेक वर्षे शासनात मंत्री म्हणून काम केले आहे. दोघांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी केलेल्या कामाचा कोणाला फायदा होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कन्या-पुत्राच्या विजयासाठी दोन्ही पित्यांनी सारा मतदारसंघ पालथा घातला आहे.
सिनेसृष्टी असो वा राजकारण, त्या ठिकाणी एक निश्चित दिसते ते म्हणजे मुला-मुलींना आपल्या क्षेत्रात आणण्यासाठी पिता करत असलेली कसरत. राज्यभरातील राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही. त्यात नंदुरबार तरी कसे अपवाद असणार. राजकीय वारसदार असो वा सिनेसृष्टीतील स्टारपुत्रांना बघितले तर त्यांच्या मागे पित्याचे कर्तृत्व असतेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.