Nandurbar News : येथील डॉ. विजयकुमार गावित व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या राजकीय संघर्षाच्या अनुभुतीतून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविषयी टोकाचे राजकारण केले. मात्र अनेकदा त्यांना पुन्हा निवडणुकीचा निमित्ताने एकाच व्यासपीठावर येऊन निवडणुकीचे काम केल्याचे नंदुरबारकरांनी पाहिले आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)
त्यामुळे त्यांच्या वादातील वेळोवेळी पडलेले पडदे म्हणजे राजकीय वेल्डींग म्हणून खूपच चर्चा रंगू लागली होती. या दोघांमधील ही वेल्डींग अनेकदा झाली मात्र ती जास्त काळ टिकलीच नाही. अनेकदा पुन्हा तुटली. आताही तीच स्थिती आहे. वेल्डींग तुटली आहे, मात्र यावेळेस तरी ती वेल्डींग जुळेल असे चित्र दिसत नाही.
म्हणून अनेकजण आता हिंदी चित्रपटातील डॉयलॉगप्रमाणे ‘यह वेल्डींग अब नहीं जुडेगी शायद...’ असे म्हणतांना दिसत आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो, असे म्हटले जाते. कारण राजकारणात कोण जवळचा मित्र केव्हा शत्रू होईल, याची शाश्वती नसते. याचा प्रत्यय नंदुरबार जिल्हावासियांनी यापूर्वीही घेतला आहे.
तो आजच्या तारखेतही अनुभवत आहेत. नंदुरबारचा राजकारणातील खरा संघर्ष आहे, तो मंत्री डॉ. गावित व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील. या दोघांचे नाते तसे तर साले -पाहुणे या प्रमाणेच आहे. कारण दिवंगत लोकनेते बटेसिंहभैय्या रघुवंशी व डॉ. गावित यांचे सासरे आर.पी.वळवी हे जीवलग मित्र. मित्राचे जावई म्हणजे आपले जावई असे बटेसिंहभैय्या मानत होते. (Nandurbar Political News)
त्या नात्याने चंद्रकांत रघुवंशी व डॉ. गावित यांचे साले-पाहुण्याचे नाते जमते. राजकीय मैत्रीच्या वेळेस असो की राजकीय वादप्रसंगी भाषणात हे दोघेही नेते एकमेकांना साले-पाहुणे म्हणून टोमणेही मारत असल्याचे नंदुरबारकरांना माहिती आहे. मात्र या दोघांमध्ये राजकीय मतभेद आजही कायम आहेत. खरा राजकीय विरोध या दोघांमध्येच मानला जातो, त्याची कारणे अनेक आहेत.
साधारण २००१ च्या विधानसभेपासून या नेत्यांच्या वादावर अनेकदा पडदा टाकत वेल्डींग झाली. सोबत कामे केले,मात्र ती वेल्डींग काम झाल्यावर तुटतच राहिली. मागील निवडणुकीत तर ही वेल्डींग आता कधीच तुटणार नाही असे पक्के आश्वासन या नेत्यांनी दिले होते. मात्र ती अखेर तुटलीच. दोघांमध्ये राजकीय संघर्ष विकोपाला गेला असतांना चंद्रकांत रघुवंशी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर डॉ. गावित हे राष्ट्रवादीचे मंत्री होते.
राज्यात वेळोवेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत गेली. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळत निवडणुक आली की, हे दोन्ही नेते एकत्र येत. कार्यकर्त्यांना आमची वेल्डींग झाल्याचे जाहीर करत मात्र निवडणुकीनंतर वेल्डींग खंडित होते. असे सुरू असतांना डॉ. गावित भाजपमध्ये गेले. त्यानंतर श्री. रघुवंशी हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेले.
योगायोगाने या दोन्हीही पक्षाची पुन्हा युती झाली. त्यामुळे युतीधर्म पाळत या दोघांवर पुन्हा ‘तुझे माझे जमेना,तुझ्यावाचून करमेना’ या उक्तीप्रमाणे पुन्हा निवडणुकीत एकत्र येण्याची वेळ आली आहे. मात्र एकदा नव्हे; तर अनेकदा वेल्डींग तुटली.आता पक्ष आदेश आला तरी जमणार नाही,अशी खूणगाठ बांधत चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट गावित परिवाराला विरोध दर्शविला.
लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त पुन्हा हे नेते एकाच व्यासपीठावर येतील,अशी चर्चा रंगू लागली. मात्र निवडणुक जाहीर झाल्यापासून श्री. रघुवंशी युतीच्या कोणत्याही बैठकीला गेले नाहीत किंवा बोलावलेही गेले नाही, अशी चर्चा आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तरी ते उपस्थित राहतील, असे वाटत होते.
आज महायुतीतर्फे भाजपचा डॉ. हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. मात्र शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी नातेवाईकांचा विवाह सोहळ्यानिमित्त इतर राज्यात गेल्यामुळे ते उपस्थित राहिले नाहीत. आघाडीच्या वेळेस वेळोवेळी डाग दिलेली वेल्डींग तुटली असली तरी आता पुन्हा वेल्डींग होईल, अशी आशा मावळली असल्याचे चित्र आहे. तरीही निवडणुकीच्या प्रचारात त्यांची भूमिका काय असेल याबाबत उत्सूकता कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.