Nandurbar Unseasonal Rain : तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर, गोपाळपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरात सोमवारी (ता.१३) आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे आणि नंतर झालेल्या काहीशा हलक्या पावसामुळे परिसरातील आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. वेगवान वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांच्या कोवळ्या कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे बागांमध्ये सर्वत्र कैऱ्यांचा सडाच पडलेला दिसून आला. यामुळे परिसरातील आंबा बागा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. ( Unseasonal Rain Mango damage due to strong wind in taloda )
तळोदा तालुक्यातील रांझणी, गोपाळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन व आसपासच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर केसर आंब्याच्या बागा असून या भागात यंदा चांगले मोहोर घेऊन चांगली फळधारणा झालेली होती. संबंधित आंबा बाग उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांना बागा विकण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरात मोठ्या संख्येने गुजरात, उत्तर प्रदेश येथून व्यापारी दाखल झाले होते आणि त्यांच्याकडून कच्च्या कैऱ्या तोडून त्या पॅकिंग करून बाहेर निर्यात करण्यात येत होत्या.
परंतु काही दिवसांपासून परिसरात ढगाळ हवामान होते आणि त्यातच सोमवारी (ता.१३) सायंकाळी अचानक वेगवान वारा सुटला. वाऱ्यामुळे बागांमध्ये कोवळ्या कैऱ्या गळून पडल्या. वेगवान वाऱ्यामुळे परिसरातील आंबा बागांमध्ये छोट्या-मोठ्या कैऱ्यांचा सडाच पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. व्यापाऱ्यांकडून त्या कैऱ्या बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र कोवळ्या कैऱ्या फेकून देण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे.
एकंदरीत यामुळे उत्पन्नात घट येणार असून भावातील तफावत राहणार असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज ही वेलवर्गीय पिकांची लागवड केली होती. त्यांची तोडणी काही दिवसांवर आलेली असताना जोरदार वारा, पावसामुळे ही फळे वेडीवाकडी आकार घेऊ लागली असून त्यामुळे उत्पन्न तसेच भावाचा फटका बसणार आहे. (latest marathi news)
तसेच परिसरात वांगी, गिलकी, भेंडी, चवळी, टोमॅटो, मिरची यासारखी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु वेगवान वाऱ्याने या पिकांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तसेच परिसरात बाजरी कापणी, मळणी, भुईमूग काढणी सुरू होती. अचानक आलेल्या वारा, पावसामुळे चाऱ्याचे तसेच बाजरीचे नुकसान झाले असून आता हाता तोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमधून निराशा व्यक्त होत आहे.
बत्ती गुल, पाण्याची टंचाई
शेतशिवारात वेगवान वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज खांब व झाडे उन्मळून पडले. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाल्याचे चित्र होते. काही ठिकाणी रात्रभर विद्युत पुरवठा नसल्याने सकाळपासूनच पाण्याच्या शोधासाठी ग्रामस्थ इकडे-तिकडे फिरत असल्याचे चित्र होते. त्यांना पाण्यासाठी हातपंपांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे हातपंपावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.
मतदान केंद्रांवरही धावपळ
सोमवारी सायंकाळी मतदान केंद्रांवर कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावरून निघण्याची तयारी करत असतानाच आलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांची एकच भंबेरी उडाली. त्यातच मतदान केंद्रांवर कडक उन्हामुळे मंडप टाकण्यात आले होते. वारा तसेच पावसाळी वातावरणामुळे मंडप व्यावसायिकांकडून मंडप काढण्यासाठी चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.