नंदुरबार : तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर इच्छुकांनीही गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून विधानसभा निवडणुकीचे प्रमोशन केले जात आहे. येथील इच्छुकांच्या संख्येमुळे जिल्ह्यात हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. (Vidhan Sabha Election number of aspirants from Taloda Shahada Constituency is more)
त्यामुळे जो-तो आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, यासाठी फिल्डींग लावण्याचे काम करीत आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारीची लॉटरी लागते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघ हा तळोदा आणि शहादा तालुक्यात विभागला गेला आहे. या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत उदेसिंग पाडवी यांनी ॲड. पद्माकर वळवींचा पराभव करीत विजयी झाले होते.
त्यांनी पाच वर्ष चांगले काम केले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत पक्षांतर्गत वादामुळे त्यांचे तिकिट कापून त्यांचा मुलगा राजेश पाडवी यांना पोलिस अधिकारी पदाचा राजीनामा देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे उदेसिंग पाडवी यांना डच्चू दिला होता. दोघा पिता-पुत्रांमध्ये कौटुंबिक वाद आहे. त्यातून भाजपने संधी साधली होती. त्यात राजेश पाडवी हेही निवडून आले. त्यांनी गेली पाच वर्षे चांगले काम केल्याच्या भावना सध्यातरी त्या मतदारसंघात मतदारांकडून व्यक्त होत आहेत. असे असले तरी भाजपमध्ये इतरही इच्छुक उमेदवार आहेत.
आमदार पाडवी यांच्यापुढे पक्षांतर्गत राजेंद्रकुमार गावित, उमेदवारीसाठी भाजपमध्ये दाखल झालेले ॲड. पदमाकर वळवी यांचे मोठे आव्हान होते. गावित हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांनीही या मतदारसंघात जोरदार बांधणी गेली पाच वर्षे केली आहे. तसेच, ॲड. वळवी हे माजीमंत्री व माजी आमदार आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार राजेश पाडवी कन्टीन्यूव्ह की राजेंद्रकुमार गावित व पदमाकर वळवी यांना संधी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे तिघेही द्विधा अवस्थेत होते. (latest marathi news)
मात्र, राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपचा राजीनामा दिला. तसेच, पदमाकर वळवी यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राजेंद्रकुमार गावित हे आता त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहेत. श्री. गावित व ॲड. वळवी यांनी अधिकृत इतर कोणत्याही पक्षात अद्याप प्रवेश केलेला नाही. परंतु, गावित व वळवी यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीची फिल्डींग लावली असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. तेथे श्री. गावित उपस्थित होते. तर वळवी यांची कन्या सीमा वळवी या कॉंग्रेसच्या अधिकृत जि. प. अध्यक्षा होत्या. वडीलांनी कॉंग्रेस सोडली तरीही त्या कॉंग्रेसमध्येच आहेत. त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी ॲड. वळवी जोर लावत आहेत. गेली अनेक महिने ते कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही संपर्कात आहेत.
मात्र, कॉंग्रेसमध्येही जि. प. चे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ. सुरेश नाईक इच्छुक आहेत. अनेक वर्ष पक्षाचे काम करीत आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. पक्षश्रेष्ठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देतात की ऐनवेळेस पक्षात येणाऱ्यांना उमेदवारी देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
भाजप-कॉंग्रेसमध्येच खरी लढत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि. प. सदस्य मोहन शेवाळे हेही इच्छुक आहेत. त्यांनी कॉंग्रेसकडेही उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेही फिल्डींग लावली आहे. तीच परिस्थिती उदेसिंग पाडवी यांची आहे. ते शरद पवार गटात होते. तेथे राजीनामा देत त्यांनीही कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. इच्छुकांची भाऊगर्दी खूप आहे.
मात्र, अंतिम निर्णय महायुती व महाविकास आघाडीचा जागा वाटपाच्या फॉर्म्यूल्यावर ठरेल. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीत नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते. यावेळीही कॉंग्रेसने चारही मतदारसंघ मागितले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. या मतदारसंघात खरी लढत भाजप व कॉंग्रेसमध्येच होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.