जिल्ह्यातून सहा हजार टनाची निर्यात; रशियात सर्वाधिक मागणी
नाशिक - कॅनडा अन् चीनची बाजारपेठ भारतीय द्राक्षांसाठी खुली झाली होती. यंदा ऑस्ट्रेलियानेही आपली दारे खुली केली आहेत. द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत 6 हजार 390 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यात सर्वाधिक 4 हजार 720 टन द्राक्षे रशियात पाठविण्यात आली आहेत. युरोपमध्ये 529, तर युरोपव्यतिरिक्त राष्ट्रांमध्ये 5 हजार 861 टन द्राक्षे रवाना झाली आहेत. चीनला 18 टनाचा एक कंटेनर पाठवण्यात आला आहे.
जिल्ह्यातून गेल्या वर्षी चीनला 25 कंटेनरमधून 400 टन द्राक्षे पाठविली होती. अमेरिका आणि चीनमधील सुप्त संघर्षात यंदा चीनच्या व्यापाऱ्यांकडून भारतीय द्राक्षांना अधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याखेरीज बांगलादेशमध्येही द्राक्षे पाठविण्यात येत आहेत. द्राक्षांना 60 ते 130 रुपये किलो असा भाव मिळत आहे. रंगीत वाणाला मिळणाऱ्या सर्वाधिक भावाचा त्यात समावेश आहे. हंगामाच्या अगोदर छाटलेल्या बागलाण, मालेगाव आणि निफाड, नाशिक, दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले आहेत.
15 लाख टनांपर्यंत उत्पादन
नाशिक जिल्ह्यात "टेबल ग्रेप्स'चे 58 हजार 368 हेक्टर क्षेत्र असून, वाइन द्राक्षांचे क्षेत्र 2 हजार 300 हेक्टरपर्यंत आहे. "टेबल ग्रेप्स' क्षेत्रामध्ये निफाड तालुक्यातील 21 हजार 941, दिंडोरीमधील 15 हजार 759, नाशिकमधील 11 हजार 671, तर चांदवडमधील 5 हजार 148 हेक्टर आहे.
'भारतीय द्राक्षांसाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. त्याच अनुषंगाने अमेरिकेतील शास्त्रज्ञ, परराष्ट्र व्यवहार विभागाचे अधिकारी आदींचे पथक गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात येऊन गेले आहे. अमेरिकेची बाजारपेठ खुली होण्यातून द्राक्ष उत्पादकांना चांगले पैसे मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.''
- नरेंद्र आघाव, उपसंचालक (कृषी)
|