नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून १४ महिन्यांत महापालिकेचे एक हजार ३६४ अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. कोरोनाबाधितांमध्ये आरोग्य विभागात सर्वाधिक, त्याखालोखाल घनकचरा व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरल्याचे समोर आले आहे. एकूण बाधितांपैकी २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. (1364 employees of nashik municipal corporation have been corona affected)
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. नंतर महापालिकेने तातडीने पावले उचलत उपाययोजना सुरू केल्या. महापालिकेचे सर्व कर्मचारी, अंगणवाडीसेविका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना कामासाठी स्वत:ला झोकून दिले. कोरोनाबाधित रुग्णांना सेवा पुरविणे, कोमॉर्बिड रुग्णांचे सर्वेक्षण व नोंदणी करणे, कोरोनाबाधितांना औषधे पुरविणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लसीकरण मोहिमेत सहभागी होणे आदी कामे केली, कोविडयोद्धा म्हणून काम करीत असताना किती कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यात किती जणांचा मृत्यू झाला, यासंदर्भातील माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी यासंदर्भात महासभेत प्रश्न उपस्थित केला. नंतर आरोग्य, वैद्यकीय व प्रशासन विभागाकडून टोलवाटोलवी केल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी तातडीने माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने ३८ विभागप्रमुखांना पत्र लिहून त्या- त्या विभागातील माहिती मागविली. त्यावरून माहिती प्राप्त झाली असून, त्यात एक हजार ३६४ कर्मचारी १४ महिन्यांत बाधित आढळले, अशी माहिती प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली.
आरोग्य विभागात सर्वाधिक बाधित
आरोग्य विभागातील सर्वाधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले. ती संख्या ४६७ आहे. त्याखालोखाल घनकचरा व्यवस्थापन २६९, शिक्षण १३३, पंचवटी विभागीय कार्यालय ५१, सातपूर विभागीय कार्यालय ४६, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल ३७, विद्युत विभाग २३, पश्चिम विभागीय कार्यालय ३२, सिडको विभागीय कार्यालयात १४, पूर्व विभागीय कार्यालयात २८, पाणीपुरवठा विभागात २३, अतिक्रमण विभागातील १२, सुरक्षा विभागात १६, नगरसचिव विभागात २१, बांधकाम विभागातील ११, मोरवाडी रुग्णालय १९ याप्रमाणे कोरोनाबाधित कर्मचारी आढळून आले.
२७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
एक हजार ३६४ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले, तर २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात घनकचरा विभागातील सात, सातपूर विभागातील पाच, पंचवटी विभागीय कार्यालयात तीन, शिक्षण विभागातील तीन व आरोग्य विभागातील तीन, नाशिक रोड विभागातील मलनिस्सारण कार्यालय, सुरक्षा विभाग, पूर्व विभाग, विद्युत, नगररचना विभाग, जलतरण विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला मृत्यूने गाठले, अशी महिती अहलावातून समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.