YCMOU News : शेतीतील कृषीमालाचे उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देत तोट्यातील व्यवसाय नफ्यात आणावा, असे विविध उद्देश साध्य करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अनोखा प्रयोग राबविण्याचे निश्चित केले आहे.
मधुमक्षिका पालनाला चालना देत विद्यापीठाचे १५० एकरांचे प्रांगण ‘हनी बी व्हिलेज’ म्हणून विकसित केले जाईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील १०० खेड्यांतील ग्रामस्थांना प्रशिक्षण देऊन मधमाश्यांचे गाव म्हणून या क्षेत्रांचा विकास करताना प्रकल्पाला राज्यस्तरीय स्वरूप दिले जाणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत विविध संशोधन, प्रकल्प राबविले जात असतात. (150 acre campus of ycmou university will be developed as Honey Bee Village nashik news)
याचाच एक भाग म्हणून मधुमक्षिका पालनाचा प्रयोग हाती घेतला जाणार आहे. अलीकडील काळात शेतीचे घटते उत्पन्न, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
कृषी व्यवस्थेत मधमाश्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून, अनेक पिकांचे परागीकरण मधमाश्यांवर अवलंबून असल्याचे संशोधन अहवालांतून स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट हेरताना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची ओळख मधमाश्यांचे राज्य अशी प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने प्रकल्प राबविला जातो. प्रकल्पासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. तुकाराम निकम यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुक्त विद्यापीठातील १५० एकर क्षेत्रात मधुमक्षिका पालनाचा प्रकल्प राबविला जाणार आहे. आतापर्यंत कृषी विद्यापीठांमध्ये असा प्रयोग झाला; परंतु विद्यापीठ प्रांगणापुरता मर्यादित न राहता, पुढे हा प्रकल्प राज्यस्तरावर नेण्याचा बहुमान मुक्त विद्यापीठ मिळविणार आहे.
पुढील महिन्यात प्रारंभ
सध्या प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
नोव्हेंबरमध्ये दीक्षान्त समारंभाचे औचित्य साधत राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते या प्रकल्पासह इतर विविध योजनांचा प्रारंभ केला जाईल.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तीन ते पाच गावांची करणार निवड
- प्रत्येक गावातील पाच लोकांना मधुमक्षिका पालनाचे देणार प्रशिक्षण
- मुक्त विद्यापीठातर्फे पेट्या व इतर साहित्याची उपलब्धता
- विविध योजनांचा लाभ शेतकरी लाभार्थ्यांना मिळवून देणार
- कृषी उत्पन्नवाढीचा शेतकऱ्यांना होणार फायदा
- जैवविविधता जोपासण्यासाठी प्रकल्प बजावेल महत्त्वाची भूमिका
"विद्यापीठ प्रांगणाचा हनी बी व्हिलेज म्हणून विकास घडविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प राज्यस्तरावर नेताना प्रत्येक जिल्ह्यातील किमान तीन ते पाच गावांतील ग्रामस्थांना प्रशिक्षित करीत मधुमक्षिका पालनासाठी प्रोत्साहित केले जाईल. यामुळे कृषी उत्पन्न वाढीसह शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध होऊन सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास आहे." - कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.