Inspirational News : कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्डमध्ये वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या पित्याप्रति कृतज्ञता जपून नंदुरबार येथील जगताप बंधूंनी गाडीवान, हमाल-मापाडी, गुमास्ता युनियन संघटनेला कामगारांना वैद्यकीय मदतीसाठी तब्बल दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन समाजात नवा आदर्श घालून दिला.
यानिमित्त युनियनतर्फे किशोर जगताप आणि सुधीर जगताप या बंधूंचा सन्मान करण्यात आला. (2 lakh fund for medical assistance to workers by jagtap brother nandurbar news)
सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी नंदुरबार मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करणारे मूळचे श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी साखरचंद शंकरराव जगताप यांची प्रकृती अचानक बिघडली. त्या वेळी त्यांच्या पत्नी विठाबाई साखरचंद जगताप यांनी पतीच्या वैद्यकीय खर्चासाठी हमाल कामगार बांधवांकडे मदतीची याचना केली.
त्याप्रसंगी सर्व हमाल बांधवांनी संघटितपणे केलेल्या मदतीमुळे वैद्यकीय खर्च निभावला. तब्बल २५ वर्षांनंतर (कै.) साखरचंद जगताप यांची दोन्ही मुले किशोर आणि सुधीर जगताप यांनी वडिलांप्रति कृतज्ञता जपत युनियनचे अध्यक्ष अशोक आरडे यांना भेटून कामगार बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी वडिलांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये देण्याची भावना व्यक्त केली. या अनोख्या निर्णयाने प्रथम अशोक आरडे आश्चर्यचकित झाले.
विशेष म्हणजे या देणगीबद्दल कुठेही गाजावाजा न करण्याची इच्छादेखील जगताप बंधूंनी व्यक्त केली. मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेल्या उदार देणगी दात्यांचा यथोचित सन्मान करण्याचा मानस श्री. आरडे यांनी केला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार (स्व.) साखरचंद शंकरराव जगताप यांच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त (१९ जून) हमाल-मापाडी भवनाच्या सभागृहात ज्येष्ठ कामगार भागवत भिल, नवनाथ चौधरी, नामदेव शिंदे तसेच अशोक आरडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या वेळी साखरचंद जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून कामगार व हमाल बांधवांनी आदरांजली वाहिली. सत्कार सोहळा यशस्वितेसाठी अशोक आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश कदम, बाबूलाल पाटील, छोटू पाटील, अशोक सोपनार, योगेश शिंदे व सहकारी कामगारांनी प्रयत्न केले.
प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक भान
शहरातील मनमोहननगर भागात राहणारे किशोर व सुधीर जगताप बंधू आपल्या खासगी वाहनांद्वारे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील वडिलांच्या स्मरणार्थ कामगार व कष्टकरी बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी दोन लाख रुपयांची भरीव देणगी दिल्याबद्दल मार्केट यार्डसह समाजातील सर्व स्तरांतून जगताप बंधूंचे कौतुक होत आहे.
"मार्केट यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय खर्चासाठी ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यात दिनेश खांडेकर, मंगल वळवी, नारायण कदम, संजय चौधरी, कैलास कदम, हरी जगताप यांचा समावेश होता. या वर्षापासून प्रत्येक कामगाराकडून वार्षिक २०० रुपये वर्गणी घेण्यात येऊन उपक्रम सुरू ठेवणार आहोत. आता जगताप बंधूंच्या भरघोस देणगीमुळे मोठ्या आजारासाठी कामगारांना आर्थिक मदत होणार आहे." -अशोक आरडे, अध्यक्ष, गाडीवान, हमाल-मापाडी, गुमास्ता युनियन, नंदुरबार
"आमच्या कुटुंबावर वैद्यकीय मदतीबाबत आलेला प्रसंग कोणावरही येऊ नये या भावनेतूनच वडिलांच्या स्मरणार्थ कामगार बांधवांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. याबाबत इतरांनी प्रेरणा घ्यावी हाच उद्देश आहे." -किशोर जगताप, सुधीर जगताप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.