Nashik News : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित ६६० वॉटऐवजी सोलर प्रकल्प होणार असल्याबाबत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याने कामगारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.
नाशिक औष्णिक वीज केंद्रातील टप्पा एक जागी व वसाहतीचा काही भाग तोडून नवा ६६० चा बदली संच उभारण्यात येणार होता. (2 sets of 250 watt to single center for Thermal Power Station nashik news)
मात्र, १३ वर्षे उलटूनही हा प्रकल्प मात्र उभा राहिला नाही. गेल्या काही वर्षांपासून ऊर्जामंत्र्यांचे एकच म्हणणे राहिले, की नाशिकची वीज महाग पडते; परंतु यावर कोणी विचार करीत नाही की चाळिशीच्या वयात जुने संच झाल्यावरही येथील संच पूर्ण क्षमतेने ऊर्जानिर्मिती करताहेत. जेव्हा राज्यात वीजनिर्मितीची कमतरता भासते, तेव्हा नाशिकचे तिन्ही संच चालविले जातात. मात्र, गरज संपली की एक किंवा दोन संच चालविले जातात.
नवीन संच झाल्यावर या वीजनिर्मिती संचातून जी निर्मिती होईल, तिचा दर निश्चितच कमी राहील, यात शंका नाही. मात्र, दर जास्त पडतो, हे कारण दाखवून नाशिकला कायम दुर्लक्षित केले जातेय. जर रतन इंडिया हा दहा वर्षांपासून बंद असलेला प्रकल्प कोळसा पुरवठ्याच्या अडथळ्यामुळे अद्याप सुरूही झाला नाही. तिथे वीजनिर्मिती परवडणार आहे. मग नाशिक औष्णिक वीज केंद्राची का परवडणार नाही, असा प्रश्न पंचक्रोशीतील नागरिक करीत आहेत.
येत्या काही वर्षांत जुने तिन्ही संच बंद करावे लागणार आहेत. या संचाचे काही दिवसांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट झालेले आहे आणि हा प्रकल्प चालविणे धोकादायक असल्याने हे संच बंद करण्याचा फतवा केव्हाही येऊ शकतो, अशी चर्चा आहे. मग यावर अवलंबून असलेल्या हजारो कंत्राटी कामगारांनी जायचे कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो.
कारण, नाशिक औष्णिक वीज केंद्रावर दहा हजारांवर नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पोट भरत आहेत. मग सोलर प्रकल्प आल्यास काय फायदा होणार आहे? नाशिकचे वातावरण तसे पाहिल्यास सोलरला अनुकूल नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यात आता येथे औष्णिक वीज प्रकल्प होणार नसल्याची घोषणा ऐकून कंत्राटी कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
''कुठल्याही संचाचे आयुर्मान २५ वर्षांचे असते. मात्र, त्यानंतर दर काही वर्षांनी ‘ऑडिट’ होत राहते. या संचाचे ‘ऑडिट’ होणे बाकी आहे . या संचाचे आयुर्मान वाढण्यासाठी कोणती कामे गरजेची आहेत, याचे काम आयआयटी पवई ही संस्था करणार आहे.''- प्रफ्फुल भदाणे, मुख्य अभियंता, नाशिक औष्णिक वीज केंद्र
''नाशिकचे वातावरण थंड असून, उन्हाळ्यात सोलरवर निर्मिती शक्य आहे. बाकी आठ महिने काय? आणि सर्वांत महत्त्वाचे रोजगारासाठी औष्णिकच प्रकल्प हवा. ६६० ऐवजी आम्हाला २५० मेगावॉटचे दोन संच सरकारने द्यावेत.''- शंकरराव धनवटे, अध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.