सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वावी येथील नूतन ऋषिकेश मराळे या 21 वर्षीय विवाहितेचा डेंगू या आजाराने मृत्यू झाला. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.
वावी परिसरात हिवताप आणि डेंगूसदृश्य आजाराची लक्षणे असणारे अनेक रुग्ण गेल्या दोन आठवड्यांपासून आढळून येत आहेत त्यापैकी अनेकांना डेंगू आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ( 21 year old married woman dies due to dengue in sinnar taluka nashik dengue news )
नूतन मराळे यांना अगोदर स्थानिक पातळीवर व त्यानंतर सिन्नर व नाशिक येथे वैद्यकीय उपचार देण्यात आले, मात्र स्थानिक पातळीवर आजाराचे वेळीच योग्य निदान झाले नसल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
सिन्नर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा रक्तदाब कमी होऊ लागला होता, त्यामुळे नाशिकला दोन दिवसांपूर्वीच तिला दाखल करण्यात आले होते, तेथे रक्त तपासणी केल्यानंतर डेंगू असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे नूतन हिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नूतनचा विवाह वावी येथील भांडी विक्रेते सुदाम मराळे यांच्या मुलासोबत झाला होता.
सुखी संसाराची सुरुवात असतानाच नूतनचा डेंगूच्या आजाराने झालेला मृत्यू वावीकरांना चटका लावून गेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून डासांचा उपद्रव वावी गावात वाढला आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात डेंगूचा पहिला रुग्ण निष्पन्न झाल्यावर आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले मात्र ते केवळ दिखाव्यापुरते होते. गावात बारा ते पंधरा डेंगूचे आणखी रुग्ण असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत स्थानिक आरोग्य विभाग अंधारात आहे. ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने डास प्रतिबंधक मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.