नाशिक : नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील सराफांकडून घेतलेली २५ किलो चांदीचे पार्सल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या कुरिअरच्या कर्मचाऱ्यांना अडवून एकाच्या डोक्याला बंदूक लावून संशयितांनी सदरचे पार्सल घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला.
सदरचा प्रकार ठक्कर बझार रोडवरील किशोर सुधारलयासमोर रविवारी (ता. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांची पाच पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. (25 kg of silver loot with gun Nashik Crime update Latest marathi news)
जय बजरंग कुरिअर व पार्सल सर्व्हिसेसचा कर्मचारी अमितसिंग धनसिंग सिकरवार (वय २४, रा. फावडे लेन, मेन रोड, नाशिक. मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. २१) कुरिअरचे कर्मचारी सिकरवार यांच्यासह विष्णुकुमार सिसोदिया, राज शर्मा, ओमवी आणि राह बहादूर यांनी नाशिकमधील टकले बंधू सराफ, बाफना ज्वेलर्स, खुबानी ज्वेलर्स, तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील हर्षल ज्वेलर्स यांच्याकडील सुमारे २५ किलो चांदीचे पार्सल पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे पाठविण्यासाठी ताब्यात घेतले होते.
सदरील चांदीचे पार्सल हे पुणे, कोल्हापूर, औरगाबाद येथे पाठविण्यासाठी मोपेडवरून (एमएच १२, टीएफ ७५१२) अमितसिंग, विष्णूकुमार व राज शर्मा हे ठक्कर बझार बसस्थानकाकडे निघाले. रविवारी रात्री साडेअकरा-पावणेबाराच्या सुमारास ते ठक्कर बझारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किशोर सुधारालयासमोर असताना पाठीमागून सीडी डीलक्स (एमएच १५, जीएस ५९६६) दुचाकीवरून दोघे, तर एका मोपेडवरून तिघे असे पाच संशयितांनी अमितसिंग यांची मोपेड अडविली.
संशयितांनी दोघांना मारहाण केली, तर अमितसिंग यांच्या डोक्याला एकाने पिस्टल लावली. मोपेडवरील चांदीचे पार्सलसह दोघा संशयितांनी ठक्कर बझार बसस्थानकाच्या दिशेने पोबारा केला, तर, तिघा संशयितांनी त्यांची सीडी डीलक्स दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. घटनेची माहिती कळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत सोमवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ लाख ७५ हजारांची चांदी
टकले बंधू सराफ पेढीकडील सुमारे तीन लाख ५० हजारांची सात किलो चांदी, खुबानी ज्वेलर्सकडील दोन लाख ५० हजारांची सुमारे पाच किलो चांदी, बाफना ज्वेलर्सकडील ७५ हजार रुपयांची सुमारे दीड किलो चांदी, हर्षित ज्वेलर्स (चाळीसगाव) कडील सहा लाखांची १२ किलो चांदी यांसह ५० हजारांची मोपेड दुचाकी (एमएच १२, टीएफ ७५१२) असा १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात पाच संशयितांची लुटून नेला आहे.
पोलिस उपायुक्तांच्या बंगल्यासमोरील घटना
सदरील घटना ही किशोर सुधारालयासमोर घडली आहे. शेजारीच शहर पोलिस उपायुक्तांचा बंगला असून, त्याठिकाणी पोलिसही असतात. तर, शरणपूर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस अधीक्षकांसह उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांचे बंगले आहेत. असे असताना याठिकाणी संशयितांकडून कुरिअरच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लूट केली जाते. त्याची साधी कल्पनाही या बंगल्याबाहेर असलेल्या पोलिसांना येऊ नये, याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.
"सदरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर गुन्हे शाखेच्या पथकांसह सरकारवाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आलेले आहेत. तर घटनास्थळी मिळून आलेली दुचाकी संशयितांनी पिंपळगाव बसंवत येथून चोरल्याने तपासात निष्पन्न झाले आहे."
-साजनकुमार सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.