Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनमध्ये निविदाप्रक्रिया पूर्ण झालेल्या २४ फायली केवळ कार्यारंभ आदेश देण्यावाचून सहा महिन्यांपासून पडून असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता बांधकाम दोनमध्येही जवळपास २८ फायली त्याच कारणामुळे अनेक महिन्यांपासून पडून असल्याचे आढळून आले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी या विभागाच्या घेतलेल्या आढाव्यावेळी ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे दोन्ही विभाग मिळून ४० फायली या कार्यारंभ आदेशाअभावी पडून असल्याचे आढळून आले आहे. (28 filed since 6 months in Executive Engineer office in zp nashik news)
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत ठेकेदार, आमदार यांच्या तक्रारी वाढल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी तिन्ही विभागांना पत्र देऊन त्यांच्याकडून विशिष्ट तक्त्यामध्ये माहिती मागवली होती. त्या माहितीनुसार त्यांनी बांधकाम तीनमध्ये आढावा घेतला असता, त्यांना सहा महिन्यांपासून २४ फायली पडून असल्याचे आढळून आले.
तसेच इतरही अनियमितता आढळल्याने त्यांनी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे. त्यानंतर डॉ. अर्जुन गुंडे यांनी गत आठवड्यात बांधकाम विभाग क्रमांक दोनचा आढावा घेतला. त्यात या विभागाने दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी निविदाप्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही जवळपास २८ कामांच्या कार्यारंभ आदेश देण्याच्या फायली तशाच कार्यालयात पडून असल्याचे आढळून आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी या फायली बघितल्या असता, त्यातील बहुतांश फायली या अंगणवाडीच्या बांधकामाच्या आहेत. या फायली पडून असल्याची विचारणा संबंधित दोनचे कार्यकारी अभियंता यांना केली असता, त्यांना उत्तर देता आलेले नाही. या कामांचे तातडीने कार्यारंभ आदेश देण्याचे आदेश डॉ. गुंडे यांनी दिले आहेत.
प्रक्रिया राबविल्यानंतर किती दिवसांमध्ये कार्यारंभ आदेश द्यावेत, याबाबत मर्यादा ठरवून देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी असतात त्या वेळी आपल्या गटातील कामाबाबत ते आढावा घेत असतात. आता प्रशासक कारकीर्दीमुळे कोणत्याही कामाचा कोणीही आढावा घेत नसल्यामुळेच कार्यकारी अभियंता यांच्या दालनात महिनोनमहिने फायली पडून असल्याचे दिसत आहे.
अंगणवाडी बांधकामाबाबत उदासीनता
बंधारे, रस्ते यांसह इतर बांधकामांच्या निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर पात्र ठेकेदार स्वतः कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात येऊन कार्यारंभ आदेश घेऊन जातात. मात्र, अंगणवाडी बांधकामासाठी ठेकेदार काम करण्यास आधीच इच्छुक नसतात. त्यातच काम मिळाल्यानंतर कार्यारंभ आदेश मागणीसाठी गेल्यानंतर त्या कार्यालयातून होत असलेल्या आर्थिक मागणीमुळे अंगणवाडीचे बांधकाम करणारे ठेकेदार फिरकत नसल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.