Lalit Patil Drug Case : पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्जमाफिया ललित पाटील (पानपाटील) यास पुणे पोलिसांनी गुरुवारी (ता.२) मध्यरात्रीनंतर नाशिकमध्ये आणून शुक्रवारी (ता.३) पहाटेपर्यंत कसून तपास करीत ३ किलो सोने जप्त केले आहे.
ड्रग्जच्या पैशांतून पाटील बंधूंनी मोठयाप्रमाणात सोन्याची खरेदी केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर येते आहे. (3 Kg Gold seized from Lalit Patil MD drug case Thorough investigation in Nashik by Pune Police crime)
२०२० मध्ये चाकण येथील एमडी ड्रग्जचा कारखाना पुणे पोलीसांनी उदध्वस्त करीत ललित पाटीलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याचप्रकरणात तो येरवडा कारागृहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाच्या नावाखाली तो ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता.
परंतु त्याचवेळी तो एमडी ड्रग्जचे रॅकेटही चालवत होता. ससून रुग्णालयात ड्रग्जचा साठा पोलिसांच्या हाती लागताच ललित पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते.
सुमारे तीन आठवडे तो पोलिसांना हुलकावण्यात देत बंगलोरमार्गे चेन्नईला पोहोचला असता, त्याच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांनी त्यास अटक केली. मुंबई पोलिसांच्या ताब्यातून गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.
ललित पाटील याचा ताबा मिळताच, पुणे गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त व तपासी अधिकारी सुनील तांबे यांनी अतिशय गोपनीयता बाळगत गुरुवारी (ता२) मध्यरात्रीनंतर दीड-दोन वाजता ललितला घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले.
शुक्रवारी (ता.३) पहाटेपर्यंत पुणे पोलिसांनी ललित यास तो पुण्यातून पलायन केल्यानंतर नाशिकमध्ये ज्या-ज्या ठिकाणी आला त्या-त्या ठिकाणी नेऊन चौकशी केली. तसेच, यातून पोलिसांच्या हाती आणखी तीन किलो सोने लागले आहे.
या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचप्रमाणे, ड्रगजच्या पैशातून त्याने सोन्याशिवाय मालमत्तेत गुंतवणकू केली आहे असावी, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. शुक्रवारी (ता.३) उजडेपर्यंत पुणे पोलिस ललितला घेऊन परत पुण्याकडे निघून गेले होते.
नावे उघड होणार का?
ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी अटक केली असता, त्यावेळी त्याने ‘मला ससूनमधून पळवून लावणार्यांची नावे सांगणार आहे,’ असे प्रसारमाध्यमांसमोर म्हणाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या चौकशीतूनही काहीही समोर आलेले नाही.
त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या चौकशीतून तरी ललित कोणाचे नावे उघड करणार होता, ते समोर येईल का, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. ललित पाटीलच्या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक राजकारण्यांची नावांची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.