त्र्यंबकेश्वर (नाशिक) : ‘निवृत्तिनाथ महाराज, ज्ञानोबा माऊली की जय’, ‘त्र्यंबकेश्वर भगवान की जय’ अशा जयघोषाने आज दिवसभर त्र्यंबकेश्वरनगरी दुमदुमली. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त अवघी नगरी दिंड्यांनी फुलून गेली आहे.
संत निवृत्तिनाथ महाराज समाधीचरणी तीन लाखांहून अधिक भाविक लीन झाले. कोरोनानंतरच्या यात्रोत्सवात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या यापूर्वीच्या तुलनेत एक लाखांहून अधिक होती. (3 lakh devotees at Sant Nivruttinath Yatrotsav at Trimbakeshwar nashik news)
पौष वद्य एकादशीनिमित्त पायी दिंड्यांसह विविध वाहनांद्वारे भाविकांसह वारकरी शहरात दाखल झालेत. रात्रभर दिंड्यांसह वारकऱ्यांचे आगमन सुरू होते. पहाटे तीनपासून गोदावरीच्या कुशावर्त तीर्थामध्ये स्नानासाठी गर्दी उसळली.
भक्तिमय वातावरणात संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर विश्वस्तांनी पहाटे समाधीची विधिवत पूजा केली. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक समाधीचे विधिवत पूजन केले. त्यांच्यासमवेत आमदार हिरामण खोसकर, भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
शहराच्या विविध भागात भजन-कीर्तनाने वातावरण भारावून गेले होते. ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी जाण्यासोबत अनेक भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा केली. दिंड्या आणि वारकऱ्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे आपल्या नेहमीच्या जागी व पर्यायी जागेवर व्यवस्था करण्यात आली होती.
म्हाळसादेवी मंदिर, अहिल्याडॅम, स्वामी समर्थ गुरुपीठ परिसरासोबत जव्हार रस्ता, साधू आखाड्यांच्या जागेवर दिंड्या विसावल्या आहेत. संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर रस्ता ते नगर परिषद कार्यालयाच्या मागील बाजूला दुकाने थाटण्यात आली आहेत.
विठुराया-रुक्मिणीमातेच्या पंढरपूर येथील हळद-कुंकू, बुक्का, माळासह राजूरचा पेढा विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय रहाट पाळणे, चिमुकल्यांसाठीची खेळणी आणि मनोरंजनासाठी तमाशा फडांनी परिसरातील उत्साह द्विगुणित केला आहे.
भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय चुकलेल्यांना ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून माहिती देत त्यांच्या ठिकाणी पोचविले जात होते. राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडून भाविकांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती.
स्नान अन् मुखदर्शनाने परतीचा प्रवास
अनेक भाविकांनी स्नान अन् मुखदर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. दिंड्यांच्या फडावर विविध उपक्रम राबविण्यात येत होते. गुरुवारी (ता. १९) द्वादशीला काल्याचे कीर्तन झाल्यावर उपवास सोडून उरलेल्या वारकऱ्यांचे प्रस्थान शहरातून सुरू होईल. दरम्यान, निर्मलवारी संकल्पनेतून निर्मल दिंडीसाठी पारितोषिक देण्यात येणार आहेत.
दिंड्यांना त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतर्फे पहिल्या तीन क्रमांकाची आणि उत्तेजनार्थ दोन, अशी पारितोषिके देण्यात येतील. नगर परिषदेचे प्रशासक संजय जाधव हे संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर व त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळात असल्याने त्यांनी यात्रेचे नियोजन करण्यात भूमिका बजावली.
बेलापूरकर, देहूकर यांच्यासह संत निवृत्तिनाथ महाराजांचे बंधू आणि शिष्य आळंदी, देहू, सोपानदेव यांची सासवड व मुक्ताबाई यांच्या पालखीचे प्रमुखांनी उपस्थिती दर्शविली. मात्र निर्मलवारीसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयांसाठी पाणीपुरवठा नसल्याने भाविकांची काहीशी अडचण झाली.
हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
रथोत्सवात भक्तीमध्ये वारकरी तल्लीन
संत निवृत्तिनाथ महाराजांच्या चांदीच्या पादुका आणि प्रतिमा सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आली होती. ही पालखी फुलांच्या माळांनी सजविलेल्या रथामध्ये होती. संत निवृत्तिनाथ महाराजांच्या रथोत्सवामध्ये संत निवृत्तिनाथ महाराजांचा जयघोष करत वारकरी तल्लीन झाले होते.
रथापुढे मानाच्या दिंड्या आणि वारकरी भगवाध्वज घेऊन सहभागी होते. भजन करत वारकऱ्यांची शिस्तबद्ध पावले नगरीच्या रस्त्यांवरून पडत होती. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर, पूजक विश्वस्त जयंत महाराज गोसावी, भानुदास गोसावी, योगेश गोसावी आणि इतरांचा रथोत्सवात सहभाग होता.
रथ ज्ञानेश्वर मंदिर परिसरातून तेली गल्ली, पाटील गल्ली, पोष्ट लेन येथून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आला. इथे या मंदिराच्या विश्वस्तांनी रथाचे स्वागत केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.