जायखेडा : येथील वाडीपीसोळ शिवारातील शेती वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या राहत्या घरांना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन घरांसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
सुदैवाने तीनही कुटूंबीय मजुरीसाठी बाहेर गेले असल्याने मोठी जीवित हानी टळली. या आगीत पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पाथमिक अंदाज असून तिघांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र आगीचे निश्चित कारण समजू शकले नाहीत.
आज शनिवार (दि.२८) रोजी सकाळी दादाजी पुंजाराम जगताप, हिम्मत वंकर माळी, महादू बाळू सोनवणे हे तीनही कुटुंब नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरांतुन मोठमोठे आगीचे व धुराचे लोळ निघत असल्याचे शेजारीच राहणाऱ्या तेजस शेवाळे याच्या लक्षात आले. त्याने लगेच आरडाओरड करत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवले. त्या शेतकऱ्यांनी लागलीच आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र सर्व घरे एकमेकास लागून असल्याने व आगीने रौद्र रूप घेतल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, कपडे व घरातील रोख रक्कम जळून खाक झाले. या घटनेची माहिती चंद्रकांत शेवाळे यांनी वाडीपीसोळचे पोलीस पाटील योगेश खैरनार, माजी सरपंच दगा सोनवणे यांना कळविली. त्यांनी तातडीने सदर घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला दिली.
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीतिची पहाणी केली व तीनही कुटुंबाना वयक्तिक प्रत्येकी पाच हजार रुपयांची तातडीची मदत दिली. तसेच बागलाणचे तहसीलदार यांना सूचित करीत तीनही कुटुंबियांना शासकीय मदत देण्याच्या सूचनाही केल्या.
या आगीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तीनही कुटुंबांचे सर्वस्व उध्वस्त झाले असून या कडाक्याच्या थंडीत केवळ अंगावरचे कपडे शिल्लक राहिले आहेत. यावेळी घटनास्थळी महसूल यंत्रणेकडून पंचनाम्याचे काम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.