मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : रणरणत्या उन्हाने (Summer) सर्व नागरिक हैराण झालेले आहेत. तप्त उन्हाने जनसामान्यांची त्रेधा उडवली आहे. असह्य उन्हाच्या तडाख्यातून बचावासाठी रसदार टरबूज (watermelon) फळाला प्रचंड मागणी आहे. येथील बाजार समितीत दरदिवशी सरासरी तब्बल तीनशे टन टरबूजची विक्रमी खरेदी विक्री होत आहे. रमजान सण व कडक उन्हामुळे टरबूज, खरबूजचा व्यापाराला बहर आला आहे. उत्पादकांना यंदा स्थिर भाव मिळाल्याने सुखावले आहेत.
मालेगाव शहर व तालुक्यात सध्या टरबूज आणि खरबुजाला प्रचंड मागणी आहे. येथील बाजार समितीच्या आवारात कसमादे व खानदेश भागातून विविध जातीच्या टरबुजांची आवक होत आहे. कडक उन्हाळा व रमजान (Ramzan) सणामुळे टरबूज, खरबुजला पहिली पसंती मिळत आहे. मार्च महिन्यात सुरू झालेला टरबूजचा बाजार सध्या मागणीच्या सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. रमजान संपल्यावरही टरबुजची मागणी कायम राहणार आहे. रमजान सणाच्या नियोजनानुसार उत्पादन घेणाऱ्यासह उशिराच्या उत्पादकांनाही वाढत्या उन्हामुळे बाजारभाव मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ठोक बाजारात मार्च महिन्यात पंधरा रुपये प्रतिकिलोने आरंभ झालेली खरेदी सध्या पाच ते आठ रुपये प्रतिकिलोपर्यंत आली आहे. टरबूज व खरबूजची किरकोळ विक्री मात्र दहा ते २० रुपये दराने होत आहे. निव्वळ टरबुजची दैनिक उलाढाल कोटींची उड्डाणे घेत आहे.
मालेगावची ‘बातच न्यारी’
रमजानमुळे टरबुज, खरबूजची बाजारपेठ फुलते हे सर्वश्रुत आहे. उत्पादक तसे नियोजन करतात. यावर्षी कोरोनाची बंधने उठवल्याने मनमुराद खरेदी होत आहे. रमजान व उन्हाळा यामुळे ‘घर तेथे टरबूज’ बघावयास मिळत आहे. दिवसाला तीनशे टन टरबूज, खरबूज फस्त करणाऱ्या या शहराची ‘बातच न्यारी’ असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
अनेक व्हरायटी उपलब्ध
सध्या बाजारात शुगर किंग व सागर किंग ह्या व्हरायटीसोबतच जिग्ना गोल्ड, सुपर क्वीन, सिम्बा, मेलोडी, बाहुबली, रसिका या नवीन व्हरायटीचे टरबूज, खरबूज बाजारात अवतरली आहेत. सामान्य ग्राहकांनी फळांच्या या व्हरायटीचे सहसा आकलन होत असते. टरबूज आत लाल आहे का, इतकीच शहानिशा करून ग्राहक खरेदी करतात. चव, रंग, फळातील बियांची संख्या आणि टिकाऊपणा या बाबी व्हरायटीनुसार कमी- अधिक असतात.
येथून टरबुजची होतेय आवक
शिरपूर, अंमळनेर, पारोळा, मटगावन, धुळे, संपूर्ण कसमादेचा बागायती भाग.
बाजारभाव
ठोक बाजार : ५ ते ८ रुपये प्रतिकिलो
किरकोळ विक्री : १० ते २० रुपये प्रतिकिलो
''प्रचंड मागणी आणि बाहेरील जिल्ह्यातून होणारी आवक यातून समनव्य साधला जात आहे. दोन वर्षे कोरोनामुळे उत्पादकांना फटका बसला. यंदा विक्रमी मागणीने सुखद धक्का दिला आहे.'' - रफिक बागवान, संचालक, ३६,अपना फ्रुट कंपनी, मालेगाव बाजार समिती
''कसमादे भागात यंदा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले आहे. सण आणि ऊन यामुळे प्रचंड मागणी वाढली आहे. मे महिन्यातही मागणी कायम राहणार असल्याने उत्पादकांना अंतिम टप्प्यातही भाव मिळू शकतो.'' - गौतम पटाईत, संचालक, २१, बळीराजा फ्रूट कंपनी, मालेगाव बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.