Nashik Leopard News : बागलाण तालुक्यातील जोरण फाटा ते किकवारी बु. गावांदरम्यान बिबट्या व मादीसह त्यांच्या तीन बछड्यांनी धुमाकूळ घातला असून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. तर रात्रीच्या सुमारास शेतात पाणी भरत असलेल्या शेतक-यांवरही त्यांच्याकडून हल्ला होत आहे.
या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून बिबट्यांच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाटसरूंसह शेतकऱ्यांनी केली आहे. (4 injured in Leopard attack on running bikes nashik news)
बागलाण तालुक्यातील जोरण फाटा ते किकवारी बुद्रुक या एक किलोमीटरवरील रस्ता व शेती क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचा संशय शेतकरी व नागरीकांनी व्यक्त केला होता. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरण ते किकवारी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर बिबट्याने हल्ला केला.
त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर बिबट्यांनी हल्ला केला. यात किकवारी येथील प्रल्हाद तानाजी म्हसदे, सोनाली शरद सोनवणे, अशोक कारभारी आहिरे, तळवाडे दिगर येथील बापू डोंगर पवार जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, की दोन बिबटे व त्यांच्या बरोबर तीन बछडे या परिसरात वास्तव्यास आहेत. या गावांजवळून हत्तीनदी असल्याने नदीच्या परिसरात त्यांचे वास्तव्य असावे. बिबट्याने हल्ला केला, त्या ठिकाणापासून काही अंतरावरच किकवारी बुद्रुक गाव आहे. तेथे इंग्लिश मेडीअम स्कूल व पोल्ट्री फार्म असल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सद्यःस्थितीत रात्रीची लाइट असल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जातात. बिबट्यांच्या दहशतीमुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. सर्वत्र एलईडी लाइट असल्यामुळे त्या प्रकाशाचा कोणताही परिणाम बिबट्यावर होत नाही. दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचे इंडिकेटर अग्नी या पासून बिबट्या पळ काढतात.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा संदेश भ्रमणध्वनी वरून या गावांमध्ये दिला जात आहे. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची मागणी जोरण, किकवारी बुद्रूक, तळवाडे आदी गावांमधून होत आहे.
''जोरण, किकवारी परिसरात तीन दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. खबरदारीसाठी गावांमध्ये रस्त्याच्या कडेला, हत्तीनदी परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास राहावे, बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.''- पी. बी. खैरनार, वनक्षेत्रपाल, बागलाण.
''किकवारी बुद्रुक परिसरातील जोरण फाटा ते किकवारी बुद्रुक रोड दरम्यान रात्री बिबट्या दुचाकींवर हल्ला करत आहे. किकवारी बुद्रुक गावाजवळ पिंजरा लावलेला आहे, बिबट्या सापडेपर्यंत कोणीही रात्रीचा त्या रस्त्याने वापर करू नये.''- राकेश घोडे, निसर्ग व प्राणीमित्र सटाणा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.