मालेगाव : चंपाषष्ठीला सोमवारी (ता. १८) ‘येळकोट-येळकोट, जय मल्हार' च्या गजराने चंदनपुरीनगरी दुमदुमून निघाली. तालुक्यासह ‘कसमादे'तील ५० हजारांवर मल्हारभक्त श्री खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाले.
देवाला भरीत भाकरीचा नैवेद्य देण्यात आला. काही कुटुंबीयांनी भरीत भाकरीबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य आणला होता. सकाळी मंदिरात अभिषेक व आरती झाली. घट विसर्जनाने श्री खंडेरायांच्या शड नवरात्रोत्सवाची सांगता झाली.
श्री खंडेराव महाराज, म्हाळसा देवी व बानाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर खोबरे-भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी देवाची तळी भरली. दरम्यान, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांची उलाढाल झाली.
चंदनपुरीत चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो. तसेच पौष पौर्णिमेला पंधरा दिवस यात्रा भरते. आकर्षक रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली.
मंदिर परिसरात श्रीफळ, पुष्पहार, भंडारा, खाद्यपदार्थ, हॉटेल, उपाहारगृह, सौंदर्य प्रसाधने आदींची दुकाने थाटण्यात आली होती.
गावाजवळील वाहनतळ ‘हाउसफुल' झाली होती. शालिमार हॉटेलपासून चंदनपुरीकडे जाताना रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. सकाळी अकरानंतर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेतून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जात होते.
दर्शनासाठी स्वयंसेवक मदत करत होते. ग्रामपंचायत व जयमल्हार ट्रस्टने भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. चंपाषष्ठीनिमित्त श्री खंडेरायाचा सहा दिवसीय शड नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.
देवाच्या मूर्तीजवळ स्थापन करण्यात आलेल्या घटाचे विसर्जन करण्यात आले. कुटुंबीयांनी वाघ्या-मुरळीकडून देवाची तळी भरण्यासाठी गर्दी केली होती. बानाई माता मंदिर परिसरात भरीत भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या गर्दीने चंदनपुरी गजबजून गेली होती.
निफाड आणि दिंडोरीमधून भाविक पदयात्रेने पोहोचले
निफाड व दिंडोरी तालुक्यातील भाविक पदयात्रेने चंदनपुरीमध्ये पोहोचले. साकोरे (मिग) येथील सुभाष बोरस्ते, अर्जून कदम यांच्या मार्गदर्शनाखालील दिंडीचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. सुभाष बोरस्ते यांच्या कुटुंबीयांकडे वर्षानुवर्षे बारा गाड्या ओढण्याचा मान आहे.
त्यांनी मानाची काठी दर्शनासाठी आणली होती. जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व कुटुंबीयांनी दिंडीचे स्वागत केले. श्री. पाटील यांनी दिंडीतील मल्हारभक्तांना पुरणपोळीचे भोजन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.