नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत महापालिकेने चार मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमता वाढीसाठी ५३० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. यापूर्वी अमृत-२ योजनेअंतर्गत टाकळी व तपोवन या दोन केंद्रांच्या क्षमता वाढीचा ३३२ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर न झाल्यास केंद्र सरकारकडील प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा महापालिकेला आहे. (530 crore proposal for sewage treatment plants Awaiting approval of NMC from Central Govt Nashik News)
महापालिकेने मलजल व्यवस्थापनासाठी सर्वकष असा मलनिस्सारण व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आराखड्यात संकल्पित केल्यानुसार भौगोलिक संरचनेच्या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रात आठ सीव्हरेज झोनमध्ये विभागले आहे.
त्यानुसार झोनमध्ये रहिवासी भागातील तयार होणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुमारे १९१९ किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्यात आल्या असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १८ पंपिंग स्टेशनद्वारे सहा मलनिस्सारण केंद्रामध्ये वाहून नेण्यात येऊन सुमारे. ३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
सद्यःस्थितीत तपोवन, आगर- टाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर व पिंपळगाव खांब या सहा सीव्हरेज झोनमध्ये मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित आहे. त्या केंद्रांची एकूण स्थापित क्षमता ३९२. ५० एमएलडी आहे. ३९२.५० एमएलडी क्षमतेच्या केंद्रापैकी तपोवन, आगर- टाकळी, चेहेडी व पंचक या चार झोनमधील ३४२.५० एमएलडी क्षमतेचे केंद्र २०१५ पूर्वी कार्यान्वित आहे.
ज्या वेळी केंद्रे बांधण्यात आली, त्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार त्यांची संरचना करण्यात आली. परंतु, आता केंद्र व राज्य प्रदूषण मंडळामार्फत प्रक्रियेनंतर सोडण्यात येणाऱ्या मलजलाच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मापदंडानुसार मलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्यासाठी तपोवन, आगर- टाकळी, चेहेडी व पंचक या ४ मलशुद्धीकरण केंद्रांचा अहवाल महापालिकेने शासनाच्या पर्यावरण विभागाकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये सादर केला होता.
राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत सचिव स्तरावरील प्रदत्त समितीने जून २०२२ मध्ये मान्यता देऊन सदर कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला जुलै २०२२ च्या पत्रान्वये मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने प्राथमिक छाननी करून सुधारित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार महापालिकेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पूर्तता करून पूर्तता अहवालासह ५३०.३१ कोटी रुपये किमतीचा सुधारित प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला मंजुरीसाठी सादर केला आहे.
क्षमतावाढीचे दोन प्रस्ताव
आगर टाकळी व तपोवन या दोन मोठ्या मलनिस्सारण केंद्राच्या क्षमता वाढीचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे. एकूण ३३२ कोटी रुपये किंमत असलेला हा प्रस्ताव अमृत दोन योजनेअंतर्गत सादर करण्यात आला आहे.
अमृत दोन योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजूर न झाल्यास केंद्र शासनाकडे दुसरा ५३० कोटींचा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात चार मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीचा समावेश आहे.
"केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत ३३२ कोटींचा एक व ५३० कोटी रुपयांचा असे दोन प्रस्ताव आहे. कुठलाही एक प्रस्ताव ना मंजूर झाल्यास दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून निधी प्राप्त करून घेता येईल."- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.