Nashik News : राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याचे काम फक्त गप्पांपुरते न ठेवता प्रत्यक्षात अमलात आणणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी रक्षा प्रकल्पांतर्गत आणखी दोन जुळ्या मुली दत्तक घेत ५५ मुलींच्या दातृत्वाचा भार अंगावर घेतला आहे.
ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. बोरस्ते फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे अनेक उपक्रम राबवितात.
गोदावरी स्वच्छता अभियान, शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा, निर्माल्य संकलन, स्वा. सावरकर संमेलन, साहित्य मेळावा, पतंगोत्सव, ढोलताशा महोत्सव ही त्यातील ठसठशीत उदाहरणे. त्यांचा निराधार मुलींना दत्तक घेण्याचा उपक्रम चर्चेत आहे. (55 girls adopted from Ajay Boraste under Raksha Project nashik news)
आतापर्यंत ५५ मुली दत्तक घेऊन त्यांना आधार दिला. उपमहापौर असताना श्री. बोरस्ते यांनी वाढदिवशी ९ सप्टेंबरला होर्डिंगबाजी, अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी लागणारा पैसा विधायक कामासाठी खर्च व्हावा म्हणून ऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना दत्तक घेण्याची संकल्पना मांडली.
पत्नी सौ. अर्चना व अजय बोरस्ते दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गरीब- गरजू मुलींसाठीच काम करण्याचा संकल्प सोडला होता. तिच्याच नावाने त्यांनी ‘रक्षा प्रकल्प’ सुरू केला. तेरा वस्त्यांतील व वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ३६ मुलींना बोरस्ते दाम्पत्याने प्रथम दत्तक घेतले. त्यातील काही निराधार, तर काही मुलींचे माता- पित्यापैकी एकच हयात आहेत.
प्रकल्पांतर्गत मुलींच्या शिक्षणाचा सारा खर्च उचलतात. सध्या दत्तक मुलींची संख्या ५५ पर्यंत पोचली आहे. त्यांना गणवेश, शालेय साहित्य दरवर्षी पुरविले जातात. याशिवाय संस्काराचेही वर्ग चालविले जातात. दर शनिवारी- रविवारी पंडित कॉलनीतील बालगणेश उद्यानातील सभागृहात मुलींना संगणक शिक्षण, गायन- नृत्याचे धडे दिले जातात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रत्येक मुलीचा वाढदिवस बोरस्ते दांपत्य मुलीच्या घरी जाऊन साजरा करतात, त्यांना नवे कपडे, भेटवस्तू देतात. प्रत्येक सण-उत्सव एकत्रित साजरा करतात. शिक्षणाबरोबरच आरोग्याचीही काळजी घेतली जाते.
प्रत्येक मुलीच्या शाळेत दर तीन महिन्यांनी प्रगतीचा आढावा घेतला जातो. मुलींच्या शिक्षणाची सुरू केलेली चळवळ पुढेही चालु राहणार असल्याचे बोरस्ते दांपत्य सांगतात. दत्तक घेतलेल्या मुली आता चांगल्या हुद्द्यावर काम करत आहे.
"अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी लागणारा पैसा विधायक कामासाठी खर्च व्हावा म्हणून ऊर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना दत्तक घेण्याच्या संकल्पनेची रूपांतर व्यापक चळवळीत होत आहे." - अजय बोरस्ते, संस्थापक अध्यक्ष, ऊर्जा फाउंडेशन.
"कुटुंबातील एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. हाच संदेश घेऊन स्त्री शिक्षणाची ही चळवळ अखंडपणे सुरू ठेवणार आहे." - अर्चना बोरस्ते, संयोजक रक्षा प्रकल्प.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.