नाशिक : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ट्विटरवरून ट्विट करत 700 ते 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा दावा केला आहे. तसेच चौकशीचे आदेशही दिले आहेत. आव्हाडांनी नेमके कोणावर आरोप केले?
महापालिकेवर आरोप करत आव्हाडांचा बॉम्ब
चार हजार चौरस फुटापेक्षा अधिकच्या प्लॉटवर बांधकाम करताना नियमानुसार वीस टक्के प्लॉट किंवा सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखिव ठेवणे बंधनकारक असून, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देण्यापुर्वी संबंधित घरे दुर्बल घटकांना विकण्यासाठी म्हाडाकडे हस्तांतरीत करावी लागतात. असे असताना गेल्या आठ वर्षात नाशिक महापालिकेने दहा घरेदेखील हस्तांतरीत न केल्याने महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना मदत केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून करताना यात ७०० ते १००० कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात महापालिकेने मात्र असा कुठलाच गैरव्यवहार वा नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
सातशे ते एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप
नोव्हेंबर २०१३ च्या नियमानुसार विकास नियंत्रण नियमावली, तसेच डिसेंबर २०२०पासून लागु करण्यात आलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका उपलब्ध होण्यासाठी नियम करण्यात आला आहे. या नियमानुसार वीस टक्के प्लॉट किंवा सदनिका बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडे (म्हाडा) हस्तांतरीत करावे लागतात. परंतू नाशिक महापालिकेने दहा घरेसुद्धा हस्तांतरीत न करता विकासकांना बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिला. हा मोठा गुन्हा असून, यातून सातशे ते एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आव्हाड यांनी गुरूवारी (ता. २०) ट्विटरवरून केला. मुंबई, ठाणे, पुणे शहरांमध्ये म्हाडाने मोठ्या प्रमाणात लॉटरी काढली असताना नाशिकमध्ये म्हाडाकडे घरे हस्तांतरीत झाली नसल्याने संशय वाढला. त्यातून साडे तीन हजार घरे हस्तांतरीत न होता परस्पर विक्री झाल्याचा संशय बळावला. २०१३ ते २०२१पर्यंत म्हाडाने महापालिकेकडे २२ वेळा पत्रव्यवहार केला. परंतू, एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. त्यानंतरही माहिती देण्यात टाळाटाळ झाल्याचा दावा श्री. आव्हाड यांनी केला आहे.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांचा आरोप; चौकशीचे आदेश, महापालिकेचा मात्र नकार
दाखले रद्द करून, गुन्हे दाखल करा : आव्हाड
म्हाडाला घरे दिली नसल्यास बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देवू नये, असा नियम असताना पालिकेच्या नगररचना विभागाने दुर्लक्ष केल्याने गरिबांना स्वस्तात घरे मिळण्याचे साधन बंद केले. ज्या जमिनी दिल्या, त्या नासर्डी पुल किंवा संरक्षण विभागाच्या जागेलगत. जेणे करून तेथे ईमारत बांधणे अशक्य आहे. यात सातशे ते एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा आरोप करताना संबंधितांचे बांधकाम पुर्णत्वाचे दाखले रद्द करून नगररचनाकारांविरोधात पोलिसात तक्रार द्यावी, असे गृह निर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले.
गैरव्यवहार नाही, चौदा प्रकल्प सुरु : आयुक्त जाधव
गृहनिर्माण मंत्र्यांच्या ट्विटनंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी गैरव्यवहार किंवा अनियमितता झाली नसल्याचा दावा केला. म्हाडाकडे हस्तांतरीत करावयाच्या सदनिकांची विक्री झाली असल्यास गुन्हे दाखल केले जातील. २०१३ पासून एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रात ३४ प्रकल्प मंजूर करण्यात आले. यातील दोन प्रकल्प म्हाडाचेच होते. दोन प्रकल्पांना म्हाडाने ना हरकत दाखला दिला. एका प्रकल्पात तीनदा जाहीरात देवूनही प्रतिसाद न मिळाल्याने बिल्डरला घरे विकण्यासाठी म्हाडाने ना हरकत दाखला दिला. उर्वरित २९ प्रकल्पांपैकी अकरा प्रकल्पांचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. एक प्रकल्प गुंडाळण्यात आला. चार प्रकल्पांचे काम पुर्ण झाले. तर, चौदा प्रकल्पांचे काम सुरु आहे. एकुण प्रकल्पांचा विचार करता २ हजार ८२९ सदनिका म्हाडाला मिळणे अपेक्षित असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.