Nashik News : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. पूर्व भागातील दुष्काळी गावांसाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात शनिवारी (ता. ९) सायंकाळी सातच्या सुमारास सुमारे ९८ टक्के इतका पाणीसाठा बघायला मिळाला.
३६१ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या भोजापूर धरणाने ऑगस्टअखेर तळ गाठला होता. मात्र म्हाळुंगी नदीचे उगमस्थान असलेल्या विश्रामगड परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची मोठी आवक तीन दिवसांपासून झाली असल्याने भोजापूर धरण रविवारी सकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. (98 percent water storage in Bhojapur dam nashik news)
पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव विश्रामगड परिसरात म्हाळुंगीचे उगमस्थान आहे. यंदाच्या पावसाळ्यात या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. जुलै, ऑगस्ट पावसाविना गेल्यामुळे भोजापूर धरणात अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मात्र गुरुवारपासून म्हाळुंगीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नदीला पूर आला आहे.
त्यामुळे भोजापूर धरणातील पाणीसाठ्यातदेखील वाढ होण्यास सुरवात झाली होती. अवघ्या तीन दिवसांतच धरणात ७० टक्के पाणीसाठा वाढला. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरूच आहे. मात्र शनिवारी या भागात पावसाने काहीशी उघडीप दिल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाहदेखील घटला होता. शनिवारी सायंकाळी सातपर्यंत धरणात सुमारे ९८ टक्के इतका पाणीसाठा होता.
भोजापूर धरणातील पाणीसाठ्याचे गणित मुख्यत्वे पश्चिम पट्ट्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अकोले तालुक्यातील पाचपट्टा डोंगररांगेत उगम पावणारी म्हाळुंगी नदी भोजापूर खोऱ्यातून पुढे जात प्रवरेला मिळते. उगमस्थान पडणाऱ्या पावसामुळे भोजापूर धरण ओव्हरफ्लो होण्याची डेटलाइन १५ ऑगस्ट आहे.
पावसाने खंड दिल्याने यंदा मात्र ही डेटलाइन हुकली होती. यंदा सिन्नर तालुक्यात पर्जन्यमान नसल्यामुळे व पाचपट्टा डोंगररांगेत देखील अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे भोजापूर धरण या वर्षी भरणार की नाही, असा प्रश्न सर्वांना भेडसावत होता. मात्र वरुणराजाची कृपा झाल्यामुळे भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भोजापूर धरणाच्या पाण्यावर सिन्नर व संगमनेरातील शेती व पिण्याच्या पाण्याची गणिते अवलंबून असतात. दर वर्षी पूरपाण्यामुळे लाभक्षेत्रातील बंधारे, तलाव भरून घेण्याचे नियोजन केले जाते. नांदूरशिंगोटे, दोडी, दातली, सुरेगाव, फुलेनगर, दुशिंगवाडी येथील लहान-मोठे बंधारे पूरपाण्याने भरून घेण्याचे नियोजन असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.