Success Story : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ‘एनसीसी’त सहभाग घेतला होता. तेव्हापासूनच खाकी वर्दीचे स्वप्न पाहत आलो. त्यासाठी खूपच खडतर मेहनती घ्यावी लागली. २०१६ मध्ये हुलकावणी दिली.
पण, पुन्हा जिद्दीने मेहनत घेतली आणि आज अकादमीचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’चा मान मिळाला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे सांगत व भावनिक होत अभिजित काळे ‘सकाळ’शी बोलत होते. (Abhijit Kale became recipient of Revolver of Honour nashik news)
अभिजित काळे मूळचे निमुणे (ता. शिरूर, जि. पुणे) या गावचे. शालेय आणि बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिरूरमध्येच घेतले. त्यानंतर मात्र पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून त्यांनी पदविका पूर्ण केली. मात्र, महाविद्यालयात असताना ‘एनसीसी’त सहभाग घेतलेला असल्याने खाकी वर्दीचे आकर्षण अभियंता झाल्यावरही कमी झालेले नव्हते.
त्यामुळे अभिजित यांनी पदविका केल्यानंतरही पुन्हा कला शाखेत प्रवेश घेतला. पदवीनंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. मात्र, तीही बहिस्थ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. त्यानंतर ‘एमबीए’ची पदवी घेतली, तीही बहिस्थ अभ्यासक्रमातूनच. हे सारे केले ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून.
२०१६ मध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यावर २०१७ मध्ये अभिजित पहिल्यांदा उपनिरीक्षक पदासाठी स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. परंतु, मैदानी चाचणीत त्यांना अपयश आले. त्यात त्यांना अडसर आले ते त्यांचे वाढलेले वजन. त्यानंतर मात्र अपयशाने खचून न जाता अभिजित यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२०१९ मध्ये परीक्षा झाली. पुन्हा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने या परीक्षेसाठीची मैदानी चाचणी २०२२ मध्ये झाली. या दरम्यान अभिजित यांनी मैदानी चाचणीसाठी खूपच मेहनत घेतली. परिणामी, प्रत्यक्ष मैदानी चाचणीत अभिजित यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. शिक्षकाचे पुत्र असल्याने मेहनत ही त्यांच्या रक्तात भिनलेली.
अकादमीतही विक्रमच
महाराष्ट्र पोलिस अकादमीत उपनिरीक्षकांच्या प्रशिक्षणादरम्यान दोन वेळा परीक्षा घेतली जाते. पहिल्या सहामाहीत अभिजित काळे प्रथम आले होते. एरवी, अकादमीच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्या सहामाहीत प्रथम आलेले प्रशिक्षणार्थी वार्षिक परीक्षेत प्रथम आलेले नाहीत.
मात्र, अभिजित यांनी सहामाही आणि नंतर वार्षिक परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावत अकादमीत एक अनोखा विक्रमच नोंदविला आहे. प्रशिक्षण संपताच प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना नवीन ठिकाणी तत्काळ हजर व्हायचे असते. अभिजित यांची पहिली पोस्टिंग गडचिरोली येथे झाली आहे. नक्षलग्रस्त भागात कामाची संधी सुरवातीलाच मिळणे आपले भाग्य असल्याचे ते म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.