Nashik Onion News : कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बाजार समितीत कांदा लिलावाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेत संप पुकारल्याने कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू व्हावेत, यासाठी गुरुवारी (ता. २१) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व बाजार समिती अधिकाऱ्यांची बैठक झाली.
बाजार समितीने व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते संपावर ठाम असल्याने जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार कारवाई होणार असून, कांदा व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करून भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
लासलगाव बाजार समितीत १३१ व्यापारी असून, या सर्व व्यापाऱ्यांवर कारवाई होणार आहे. २५ ते २७ व्यापाऱ्यांनी परवाने बाजार समितीकडे सादर केले असून, ३६ व्यापाऱ्यांना दिलेले भूखंडदेखील परत घेतले जाणार आहेत. सणासुदीच्या काळात लिलाव सुरू राहिले पाहिजेत, शेतकरी प्रतिनिधी म्हणून ही आमची भूमिका असल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
लिलाव बंदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळ व व्यापाऱ्यांची बैठक झाली. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, जयदत्त होळकर, भीमराज काळे, संदीप दरेकर, छबूराव जाधव, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, डी. के. जगताप, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, नंदकुमार डागा, सचिव नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.
दोन दिवसांपासून कांद्याची उलाढाल ठप्प
आज दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १७ बाजार समिती आणि उपबाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीसाठी न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. दोन दिवसांपासून ७० ते ८० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
"ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी वर्ग अडचणीत असताना व्यापाऱ्यांची भूमिका अयोग्य आहे, यावर मार्ग निघणारच आहे. उद्यापासून कांदा लिलाव सुरू झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे. हाय लिलाव प्रक्रियेत सहभागी न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल." - बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव बाजार समिती
"शासन स्तरावरून व्यापारी वर्गावर कारवाईचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ५४२ व्यापाऱ्यांवर कारवाई केली असून, शुक्रवारी कांदा लिलावात सहभागी न झाल्यास सायंकाळपर्यंत लेखी खुलासा करावयाचा असून, प्राप्त न झाल्यास बाजार समितीच्या मालकीची गाळे, जागा, खळे याबाबत त्वरित कारवाई केली जाणार आहे." - नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.