Nashik Bank Fraud : शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवजाच्या आधारे ७.४६ कोटी कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत (पाच दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (Advay Hire remanded in police custody till November 20 nashik bank fraud )
नाशिक ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात श्री. हिरे यांना बुधवारी (ता. १५) भोपाळ येथून अटक केली होती. गुरुवारी (ता. १६) सकाळी त्यांना न्यायालयात उभे केले असता अपर सत्र जिल्हा न्यायाधीश यु. एस. बघेले यांनी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
श्री. हिरे यांना काल अटक केल्यानंतर भोपाळ येथून तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्यांना या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रमजानपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे कायदेशीर बाबींची पुर्तता झाल्यानंतर त्यांना ओझर येथे ठेवण्यात आले होते.
आज सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी त्यांना न्यायालयात आणण्यात आले. श्री. बघेले यांच्या समोर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील महेंद्र फुलपगारे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ए. आय. वासीफ यांनी युक्तीवाद करतांना, त्यात संबंधित गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. चौकशी व तपासाकामी सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी.
कर्ज रक्कमेपैकी एकही हप्ता भरलेला नाही. तारण दिलेल्या सुतगिरणी व जमीन विक्रीतून अवघे एक कोटी ७८ लाख रुपये मिळाले आहे. कर्ज रक्कमेपैकी सुमारे सहा कोटी रुपये व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले. यातून त्यांनी काय व्यवहार केले? या पैशांचा कसा दुरुपयोग केला याची चौकशी करावयाची आहे असे सांगितले.
याउलट श्री. हिरे यांच्यातर्फे कामकाज पाहणारे ॲडव्होकेट एम. वाय. काळे यांनी गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला आहे. या गुन्ह्यातील कागदपत्र जप्त केलेली आहेत. पोलिस कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायाधीश बघेले यांनी २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तब्बल दोन तास न्यायालयीन कामकाज सुरु होते. येथील न्यायालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर हिरे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. समर्थक कार्यकर्ते न्यायालयाबाहेर अद्वय हिरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है । अद्वय हिरे जिंदाबाद यांसह विविध घोषणा देत होते.
नेमका गुन्हा काय
अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असतांना सन २०१३ मध्ये त्यांनी रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेच्या नावाने तीन टप्प्यात ७.४६ कोटी रुपये कर्ज घेतले. या सुतगिरणीच्या स्मिता हिरे अध्यक्षा होत्या. कर्ज रक्कमेसाठी तारण देण्यात आलेली जमीन कमी किंमतीची होती.
कागदपत्रांची शहनिशा न करता हे कर्ज देण्यात आले. कर्ज रक्कमेतील ६ कोटी रुपये व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले. कर्जाची रक्कम मुळात रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी विनियोग झालेली नाही. त्यातच कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी यांच्या तक्रारीवरुन रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
७ कोटीची कर्जाची रक्कम व्याजासह सुमारे २५ कोटीहून अधिक झाल्याने हा गुन्हा नाशिक ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात श्री. हिरे यांनी येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर श्री. हिरे फरार झाले होते. पोलिसांनी त्यांना भोपाळ येथे अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.