वणी (जि. नाशिक) : सप्तश्रृंगीची मातेचे मूळरुप समजले जाणाऱ्या येथील जगदंबा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार (ता.२६) पासून प्रारंभ होत असून भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी श्री. सप्तशृंगी देवी न्यास व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर दीड हजारावर भाविक महिला नवरात्रोत्सवात घटी बसणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (After 2 years thousands of women devotees will ghatasthapana at Jagdamba temple of Vani Nashik Latest Marathi News)
कोविडमुळे दोन वर्ष रद्द झालेली नवरात्रोत्सव यात्रा निर्बंधमुक्त वातावरणात होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी जगदंबा देवी मंदिरासमोर दीड हजारावर महिला भाविक नऊ दिवसांसाठी बसत असतात. सलग दोन वर्ष कोविड निर्बंधामुळे भाविक महिला जगदंबा माता मंदिरासमोर घटी बसू शकल्या नव्हत्या.
यावर्षी भाविक महिलांकडून मोठ्या संख्येने घटी बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी सप्तशृंगी देवी ट्रस्टने तयारी सुरू केली असून घटी बसणाऱ्या महिलांसाठी वॉटरप्रुफ सभामंडप टाकण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. तसेच मंदिरालगत सुस्थितीत असलेल्या खोल्यांचाही निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसराची ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला आहे.
मंदिरालगत तलाव स्वच्छ करण्यात आले असून भाविकांना स्नानासाठी तलावाच्या बाजूलाच जलवाहिनीद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक व घटी बसणाऱ्या भाविकांसाठी अॅक्वागार्डद्वारे मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने मंदिर, सभामंडप, मंदीरामागील भाग येथे २४ छुपे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवात मंदिर व गावांत २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहण्याचे नियोजन विद्युत वितरण कंपनीने करण्याबाबत ट्रस्टने कळविले आहे.
उत्सव काळात बसस्थानकातून २४ तास बस ये- जा करणार असल्याने बसस्थानकात वाहतूक नियंत्रक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. घटी बसणाऱ्या महिलांची वैद्यकीय तपासणी व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून भाविकांना मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कालावधीत वणी व दिंडोरी येथील खासगी हॉस्पिटलच्यावतीनेही आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वणीचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवानांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच गावातील सार्वजनिक उत्सव मंडळे, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
असो होणार कार्यक्रम
नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा सकाळी नऊ वाजता आरती, सायंकाळी सहा वाजता देवीची सवाद्य पालखी, सात वाजता महाआरती होईल.नाशिक येथील भागवताचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे देवी सभामंडपात २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर दरम्यान दररोज दुपारी एक ते पाच या वेळेत श्रीमद् देवी भागवत महात्म्यावर संगीतमय प्रवचनमाला होणार आहे.
उत्सवकाळात दररोज रात्री ८ ते ११ या वेळेत वेगवेगळ्या प्रसिद्ध भजनी मंडळाचा भक्तीसंध्येचा कार्यक्रम होणार आहे. महानवमी (ता ४) ला मंदिर सभामंडपात रात्री साडेआठ वाजेपासून शतचंडी याग होईल. रात्री १२ नंतर कोहळ्याचा बळी देवून पूर्णाहूती देण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भाविकांना सोयी सुविधा पुरविणेकामी न्यासाचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस व आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.