नांदगाव (जि. नाशिक) : शहरातील पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर गुरूवारी (ता. ९) शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पुरामुळे विविध रस्त्यांवर साचलेला गाळ व मलबा हटविण्यासाठी पालिकेच्या वतीने कामाला सुरवात झाली. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची घरे पुरात सापडल्याने त्यांच्यासमोर अगोदरच संकट उभे असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी येवला पालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगारांची मदत घेतली.
येवला येथून आलेल्या या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी साचलेला गाळ, कचरा व मलब्याचे ढिगारे दूर करण्याचे काम केले. रस्त्यांवरचा गाळ काढण्यासाठी मनमाड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे काम सुरूच होते. पालिकेने नदीपात्रालगतच्या रहिवाशांसाठी गुप्ता लॉन्समध्ये दोन वेळच्या भोजनसह निवास व्यवस्था करूनही नागरिक फिरकत नसल्याने आता त्यासाठी जेथे आहे त्या ठिकाणीच दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था उद्या (ता. १०) पासून अमलात येणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेचे भुसावळ मंडळाचे महाप्रबंधक एस. एस. केवडीया यांनी लेंडी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलासह नव्या सब - वेची पाहणी केली. रुळांवरून मोठ्या संख्यने मार्गक्रमण करीत असलेल्या नागरिकांची अवस्था त्यांनी बघितली. मात्र, रेल्वेच्या आरपीएफ मंडळींनी नागरिकांना कुणालाही त्यांच्याजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे नागरिकांना आपले गाऱ्हाणे मांडता आले नाही. तथापि, लेंडी नदीतून अद्यापही पूरपाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने चांडक प्लॉट, गांधीनगर भागातील रहिवाशांना रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. तर येवला - औरंगाबाद रस्त्याकडे नागरी वसाहतीमधील रहिवाशांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
दोन-तीन दिवसांत होणार पंचनामे…
आमदार सुहास कांदे यांच्या निर्देशानंतर आज (ता. ९) पासून पंचनाम्यांना सुरवात करण्यात आली. त्यासाठी प्रभारी तहसीलदार दीपक पाटील यांनी पंचनाम्यासाठी एकूण पाच पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यात अतिक्रमित बिगर अतिक्रमित अशा पंचनाम्यांचे नोंदणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून आपला अहवाल तहसिलदारांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरूवारी जवळपास चारशेच्या आसपास पंचनामे करण्यात आले. सर्व पंचनामे पूर्ण करण्यासाठी अजून तीन दिवस लागणार आहेत.
पालकमंत्री भुजबळांचा उद्या दौरा….
नांदगाव शहरासह तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी पालकमंत्री छगन भुजबळ आज (ता. १०) नांदगाव दौऱ्यावर येत आहेत. दुपारी एकला साकोरा येथील पाहणी केल्यानंतर शहरातील झालेल्या नुकसानीची पाहणी ते करतील. त्यानंतर दुपारी दोनला मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव शहर तालुका व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाबत ते आढावा बैठक घेतील.
दहेगाव धरण फुटल्याची अफवा अन् नागरीकांची पळापळ...
एकीकडे पुरातून उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना अचानक लेंडी नदीपत्रावर असलेले पालिकेच्या मालकीचे दहेगाव धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे शहरवासीय विशेषतः नदीपात्रालगतच्या नागरी वसाहतीतील व्यावसायिक, शेतकरी कमालीचे तणावाखाली खाली आले. त्यातच सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नये, या आवाहनामुळे संभ्रम दूर होण्याऐवजी गोंधळात भरच पडत गेली. शेवटी पाटबंधारे व पालिकेच्या वतीने केलेल्या आवाहनानंतर अफवेवर पडदा पडला. मात्र, या अफवेने गुरूवारी भरणाऱ्या बैल बाजारात एकच धावपळ उडाली. बैलांच्या खरेदी - विक्रीसाठी आलेली वाहने व बैलांना सोबत घेऊन वाट मिळेल त्या दिशेने पळापळ सुरू झाली. बाजार समितीच्या आवारातच हा गोंधळ उडाल्याचे बघून समितीचे सचिव अमोल खैरनार व बाबासाहेब साठे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नागरीकांची समजूत काढली. तर, दुसरीकडे नदीपात्रालगतच्या घरातील मंडळी सुरक्षित आसरा म्हणून गच्चीवर जाऊन थांबले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.