नाशिक : गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सुरू असलेली एअर अलायन्स कंपनीची विमानसेवा १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उडान योजनेचा कालावधी संपल्याचे कारण विमानसेवा बंद करण्यामागे दिले जात असले, तरी एअर अलायन्स कंपनीसंदर्भात एव्हिएशन मंत्रालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, विमानसेवा बंद होत असल्याने नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे. (Air Alliance Company Work Stop big blow to development of Nashik Latest Marathi News)
केंद्र सरकारने देशभरात उडेगा आम आदमी (उडान) योजनेंतर्गत चार वर्षांपासून ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दीड वर्षे विमानसेवा बंद करण्यात आली होती. मागील वर्षी २१ हजार प्रवाशांनी ओझर विमानतळावरून प्रवास केल्याने केंद्र सरकारच्या उडान योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण देशभरात उडान योजनेंतर्गत नाशिक येथील विमानसेवा फायद्यात असल्याचे स्पष्ट झाले. उडान योजनेंतर्गत दुसऱ्या क्रमांकावर नाशिकचा क्रमांक लागतो. कोरोनानंतर विमानसेवा पूर्ववत झाल्यानंतरदेखील मोठा प्रतिसाद मिळाला.
दीर्घकाळ विमानसेवा चालून नाशिकच्या आयटी उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत असताना अचानक विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता, अलायन्स एअर कंपनीची सेवा बंद होत असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब गंभीर असून, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
नाशिक सर्वांत फायदेशीर सेवा
नाशिक अर्थात ओझरवरून विमानसेवा सुरू करताना विमान कंपन्यांसाठी ही सेवा फायदेशीर ठरत आहे. याला कारण म्हणजे मुंबई रिझनमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासूनचे प्रवासी विमानसेवेला मिळत आहेत. त्यामुळे ओझर विमानतळावरून विमानसेवा बंद झाल्यास एअर ट्रॅफिकवरदेखील गंभीर परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या चार सेवा बंद होण्याच्या मार्गावर
नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली व नाशिक-पुणे-बेळगाव या सेवा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
"उडान योजनेंतर्गत विमान कंपन्यांना दरात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. त्यासाठी विशिष्ट कालावधी निश्चित करण्यात आला होता. तो कालावधी संपुष्टात आलेला आहे. मात्र असे असले तरी फायदेशीर मार्ग असल्याने विमान कंपन्या सेवा करतील. केंद्र सरकारने कोरोना कालावधीमध्ये बंद असलेल्या सेवेचा विचार करून किमान दोन वर्षे उडान योजनेंतर्गत मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न केले जातील." -हेमंत गोडसे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.