पिंपळगाव बसवंत : विधानसभा निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रस्थापितांनी राजकीय मशागतीला सुरवात केल्याचे चित्र निफाडमध्ये दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कांदा आंदोलन दौऱ्यात माजी आमदार अनिल कदम यांची जवळीक अनेकांच्या भुवय्या उंचवणारी ठरली.
शरद पवार यांच्याबरोबर अनिल कदम यांचा नाशिक-नागपूर हवाई प्रवास निफाडच्या राजकारणात धुरळा उडवून गेला.
त्याच दिवशी नागपूरमध्ये आमदार दिलीप बनकर यांनी शरद पवार यांचे अभीष्टचिंतन करून श्रद्धास्थान श्री. पवार असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला, पण दोन घटनांनी श्री. बनकर व कदम समर्थकांनी आपआपल्या नेत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून ‘हा सहवास कुणालाच दु:ख देऊन जाणार असेल, तर माफ करा’, असे कॅप्शन देऊन डिवचण्याचा प्रयत्न केला. (Air travel of Sharad Pawar Anil Kadam caused stir in Nifad politics Nashik Political News)
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका, राज्यातील राजकारणात अनपेक्षित घडामोडींमुळे संवेदनशील निफाड मतदारसंघातील घटनाक्रमांनी वेग घेतला आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
निमित्त ठरले ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे चांदवडला कांदा आंदोलन दौऱ्याचे. राजकीय चातुर्यठायी असलेल्या अनिल कदम यांनी पुन्हा एकदा श्री. पवार यांच्या आपण किती निकट पोहोचलो आहोत, हे दाखवून देत आमदार बनकर यांच्यावर कडी करण्याचा प्रयत्न केला.
आमदार बनकर यांची होमपिच असलेल्या पिंपळगावला महाविकास आघाडीच्या नेत्यांची फौज घेऊन श्री. कदम यांनी शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत केले.
शिवाय श्री. पवार वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये दीर्घकाळ वार्तालाप, चांदवडच्या सभेतील व्यासपीठावर भाषणात श्री. पवार यांच्या नेतृत्वावर स्तुतीसुमनांनी उधळण करत कदम यांनी लक्ष वेधले.
यावर कळस म्हणजे नाशिकहून नागपूरला खास विमानाने निघालेले श्री. पवार यांनी अनिल कदम यांना थेट विमानात आपल्यासमोरील खुर्चीवर बसविले. ‘तू आमदार कितव्या वर्षी झालास’, असा प्रश्न श्री. पवार यांनी श्री. कदम यांना विचारला.
दुलाजीनाना, विनायकदादापासून ते मालोजी मोगल यांच्यापर्यंत राजकीय स्थित्यंतराच्या गप्पा रंगल्या. हा व्हिडिओ कदम समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल करून आमदार बनकर यांच्या समर्थकांना खिजविले.
खरंतर १०९१ च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पिंपळगावच्या सभेने निवडणुकीचे वारे बदले व कदम यांना पराभवाचा धक्का बसला. तेच कदम आता श्री. पवार यांचे निकटवर्तीय म्हणून थेट विमान प्रवास करताना दिसत आहेत.
शरद पवार-अनिल कदम यांच्या हवाई प्रवासाने निफाडच्या राजकारणात धुरळा : उर्वरित बातमी
राजकारण हे अळावरचे पाणी असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आमदार दिलीप बनकर यांनी शरद पवार यांची त्याच दिवशी भेट घेत अभीष्टचिंतन केले. श्री. बनकर अजित पवार गटाकडे गेले असले, तरी राजकीय गुरूस्थानी शरद पवार हेच असल्याचे वारंवार सांगतात.
पुष्पगुच्छ देताना श्री. पवार-बनकर यांच्यातील हास्यसंवाद अद्याप कटुता नसल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ बनकर समर्थकांनी पोस्ट करत कदम यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दोन्ही व्हिडिओंमध्ये केंद्रस्थानी असलेल्या श्री. पवार यांनी निफाडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दोन्ही व्हिडिओंवरून आगामी निवडणुकीत श्री. पवार यांची ताकद कुणाच्या पाठीशी, हे सांगणे घाईचे ठरेल. कारण महाराष्ट्राचे राजकारण प्रचंड अस्थिर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.