नाशिक : गेल्या दोन वर्षामध्ये नाशिक शहरातील अंबड, सातपूरसह परजिल्ह्यात घरफोड्या (Burglary) करणाऱ्या तिघांना अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली. तिघेही संशयित हे अट्टल गुन्हेगार असून, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील पोलिस त्यांच्या मागावर होते. संशयितांकडून चोरीचे २८ तोळे सोन्यासह दोन दुचाक्या, लॅपटॉप व ओमनी, असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, २५ पैकी १४ गुन्ह्यांची (Crimes) उकल झाली आहे. (ambad police Arrested Solved 14 cases of burglary Nashik Crime News)
अभिषेक उद्धव विश्वकर्मा (२३), करण अण्णा कडुसकर (२४) आणि ऋषिकेश अशोक राजगिरे( २१), अशी संशयित गुन्हेगारांची नावे असून, अंबड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खुनाचाही गुन्हा दाखल आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सदरील माहिती दिली. अभिषेक विश्वकर्मा हा घरफोड्यांच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून, अभिषेकविरुद्ध १९ गुन्हे, तर करणविरुद्ध २१, आणि ऋषिकेशविरुद्ध २४ गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी उस्मानाबाद, बेंबळी, गंगाखेड व लासलगाव येथेही घरफोड्या, चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ११ गुन्ह्यांमध्ये हे संशयित तीन वर्षांपासून गुंगारा देत होते. तर, २०१७ पासून तिघेही अंबड परिसरातील चुंचाळे येथे वास्तव्यास होते. याच दरम्यान, २०२१ मध्ये चुंचाळे शिवारातील कारगिल चौकात संशयितांनी राजगिरेच्या भावजईचा खून केला होता.
पोलिस तपासात संशयितांसमवेत सहा साथीदारांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. सदरची कामगिरी उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, श्रीकांत निंबाळकर, सहायक निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार पानसरे, पोलिस नाईक गायकवाड, पवन परदेशी, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, योगेश शिरसाट, दिनेश नेहे यांनी बजावली.
करण सीसीटीव्हीमध्ये कैद
संशयित करण आणि ऋषिकेश हे दिवसा शहरातील बंद घरांची रेकी करायचे. त्यानंतर ते रात्रीच्या वेळी घरफोडी करून तिघेही आपापला वाटा घेऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये पसार व्हायचे. काही दिवसांनंतर ते पुन्हा यायचे आणि पुन्हा त्याच पद्धतीने घरफोडी करायचे, अशी त्यांची घरफोडीची पद्धत होती. दरम्यान, अंबडमधील घरफोडी प्रकरणात करण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यावरून त्यास पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. तर कोणत्याही तांत्रिक माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगार अभिषेकला पुण्यातून तर, ऋषिकेश यास पेठमधून अटक केली.
मोका लावण्याची शक्यता
प्राथमिक तपासामध्ये तिघेच संशयित पोलिसांच्या हाती लागले आहेत. अधिक पोलिस तपासात आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातही अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याने त्यातही त्यांचे आणखी साथीदार सहभागी असण्याची शक्यता असल्याने, मोकाच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाण्याची शक्यताही उपायुक्त विजय खरात यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.