Nashik News : नाल्यावर बांधलेला स्लॅब तोडल्याने संताप; अतिक्रमण विभागाकडून हातोडा

Sudam Demse, Bhagwan Donde and women protesting the breaking of slabs on the Prashantnagar drain.
Sudam Demse, Bhagwan Donde and women protesting the breaking of slabs on the Prashantnagar drain.esakal
Updated on

Nashik News : प्रभाग ३१ मधील प्रशांतनगर भागातील इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी बालकांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ नये यासाठी नैसर्गिक नाल्यावर बांधलेला सुमारे ४० मीटरचा स्लॅब तोडण्यास आलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला महिला आणि माजी नगरसेवक सुदाम डेमसे आणि भगवान दोंदे यांनी प्रखर विरोध केला.

मात्र वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशामुळे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी कारवाई पूर्ण केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Anger over breaking slab built on drain Hammer from Encroachment Department Nashik News)

सप्तशृंगी मंदिर कॉलनी भागात जेमिनी हाइट्स एक आणि दोन या प्रत्येकी १६ सदनिका असलेल्या इमारती असून, या इमारतींच्या मध्ये एक खासगी प्लॉट आहे. या इमारतीच्या जागेतून नैसर्गिक नाला जातो.

काही मीटर अंतरावर हा नाला पूर्णतः बुजला गेला आहे. आठ वर्षांपूर्वी या इमारतीमध्ये भाडेतत्त्वावर राहत असलेल्या एका कुटुंबातील तीन वर्षाची बालिका पाय घसरून पडली आणि दगावली.

शिवाय या नाल्यात तुंबलेल्या पाण्यामुळे होणारी डासांची पैदास, किडे, विंचू, साप आदी प्राण्यांच्या भीतीमुळे रहिवाशांनी आणि मागील बाजूस असलेल्या नागरिकांनी स्वखर्चाने नाल्यावर स्लॅब टाकला. परंतु, कुणी अनोळखी व्यक्तीने तक्रार केल्याने सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने याबाबत नोटीस दिली.

त्याला उपरोक्त कारणे देत उत्तरदेखील देण्यात आले. मात्र मंगळवारी (ता. १६) दुपारी अचानक महापालिकेचा पोलिस बंदोबस्तात मोठा ताफा जेसीबी आणि इतर वाहनांसह या ठिकाणी आला. महिलांच्या विरोधाला न जुमानता पहिल्या इमारतीमधील स्लॅब तोडण्यास सुरवात केली.

नागरिकांनी माजी नगरसेवक सुदाम डेमसे आणि भगवान दोंदे यांना याबाबत कळविले. त्यांच्यासह संतप्त महिलांनी रौद्ररूप धारण केल्याने ही अतिक्रमण मोहीम प्रदीप जाधव आणि सहकार्यांना थांबवावी लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sudam Demse, Bhagwan Donde and women protesting the breaking of slabs on the Prashantnagar drain.
Brinjal Crop Crisis : वांग्याचे 15 गुठ्यातील पीक उपटले! उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश

दरम्यान, अतिक्रमण विभागाने तक्रार आल्याने ही कारवाई करत असल्याचे सांगितले. तोडल्यानंतर या ठिकाणी सुरक्षितता, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर काय, असा प्रश्न विचारल्यावर ते बांधकाम विभाग ठरवेल, असे सांगितल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले.

कारवाई थांबवण्याची मागणी बबिता निकम, रोहिणी देवरे, सुनीता आंबेकर, मीना दाभाडे, वरदलक्ष्मी डबेटा, कांचन बनसोडे, शीतल कुटल, सोनाली हिरे, ज्योती गायकवाड, छाया परदेशी, अंबिका शशी, अनिता बोडके, सुजाता ढिकले, पूनम नागे, स्वामी कराडे, सरिता सिंग, पूजा बोरसे, शोभा ठाकूर, संगीता निकम आदींनी केली. अखेर विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी येथे येत सरकारी कामात अडथळा आणू नये असे आवाहन करत अतिक्रमण तोडले.

"लहान मुलांची सुरक्षा आणि आरोग्य जपण्यासाठी म्हणून स्वखर्चाने आम्ही हा स्लॅब बांधून घेतला होता. यापासून कोणालाही त्रास नसताना महापालिकेने केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे."

- बबिता निकम, स्थानिक महिला

"या किरकोळ स्लॅबचा बाऊ करण्यात आला. हा नियम लावला तर मग अर्धे शहर अतिक्रमण विभागाला उखडावे लागेल. अपवादात्मक स्थिती आणि सुरक्षिततेची बाब बघता ही कारवाई करायला नको होती."- सुदाम डेमसे, भगवान दोंदे, माजी नगरसेवक

"वरिष्ठ कार्यालयामार्फत ही कारवाई करण्याचे आदेश मिळाल्याने कारवाई करण्यात आली. नैसर्गिक नाले याप्रकारे बंदिस्त करणे हे चुकीचे आहे. या रहिवाशांना सुरक्षिततेसाठी नियमानुसार काय उपाय करता येईल, यासाठी बांधकाम विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे." -डॉ. मयूर पाटील, विभागीय अधिकारी

Sudam Demse, Bhagwan Donde and women protesting the breaking of slabs on the Prashantnagar drain.
Crop Crisis: धरणाच्या भरवशावरील पिके करपली! जलसंपदाच्या नियोजनाअभावी पिके वाया जाण्याच्या स्थितीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.