Nashik: रामकुंड नव्हे... रामतीर्थ!; सुंदरनारायण मंदिर ते मोदकेश्‍वर मंदिर हे क्षेत्र ‘रामतीर्थ’

Ramtirtha
Ramtirthaesakal
Updated on

नाशिक : देशातील प्रमुख नदी गोदावरी. एक हजार ४५० किलोमीटर लांबी असलेल्या गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरीवरील. ही नदी आग्नेय दिशेला वाहत राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. दक्षिण गंगा म्हणून गोदावरीला ओळखले जाते. नाशिकमधील सुंदरनारायण मंदिर ते मोदकेश्‍वर मंदिर या भागात गोदावरी दक्षिण वाहिनी होत असून, या संपूर्ण भागाला ‘रामतीर्थ’ म्हणून संबोधले जाते. (area from Sundarnarayan Temple to Modkeshwar Temple is Rama Tirtha Nashik Latest Marathi News)

नाशिकमधील ऐतिहासिक महत्त्व असलेले काळाराम मंदिर, कपालेश्‍वर मंदिर, रामतीर्थ, सुंदरनारायण मंदिर, भद्रकाली, एकमुखी दत्त हे पौराणिक गाभ्याचे तीर्थस्थान आहे. बारा ज्योतिर्लिंग, सात पुरी, चार धामप्रमाणे नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व भाविकांच्या दृष्टीने आहे. स्मार्त चूडामणी शांतारामशास्त्री भानोसे यांच्या पौराणिक, आध्यात्मिक, धार्मिक, पुराण, ग्रंथांच्या अभ्यासानुसार गोदावरीचा उगम ते बंगालच्या उपसागरामध्ये संगम होईपर्यंत एक हजार ८०० तीर्थ आहेत. ब्रह्मपुराणात त्याचा उल्लेख आहे.

त्यातील नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये आठ प्रमुख तीर्थ आहेत. त्यामध्ये ब्रह्मगिरीवरील वराह, कपोत, कार्तिकेय, कुशावर्त अन् नाशिकमधील रामतीर्थ, ब्रह्मतीर्थाचा समावेश होतो. आताचा गांधी तलाव हे स्थळ म्हणजे ब्रह्मतीर्थ होय. अहिल्यादेवी होळकर पुलाखाली चक्रेश्‍वर महादेवाचे स्थान आहे. तसेच चक्रधर स्वामींचे देखील स्थान आहे. त्याला चक्रतीर्थ म्हटले जाते. इथंपासून रामतीर्थ परिसर सुरू होतो, असेही श्री. भानोसे यांनी स्पष्ट केले. (क्रमशः)

गोदावरीचे माहात्म्य

सर्वतीर्थशिरोभूतां आद्यां गोदां च धीमहि ।

धर्मं या न: प्रचोदयात् ।।

महर्षी गौतम यांच्या तपामुळे पहिल्यांदा जगाच्या उद्धारासाठी गोदावरी नदी पृथ्वीवर अवतरली. त्यानंतर काही वर्षांनी भगीरथ राजाने सगर पुत्रांच्या उद्धारासाठी भागीरथी नदी प्राप्त केली. अर्थात, सर्व तीर्थांचे तथा महानदींमध्ये गोदावरी आद्य मानली जाते.

Ramtirtha
Guru Nanak Dev Jayanti 2022 : श्री गुरुनानक देवजींच्‍या दर्शनासाठी अलोट गर्दी

कालिंदी पश्‍चिमा पुण्या गंगा चोत्तरवाहिनी ।|

विशेषदुर्लभा ज्ञेया गोदा दक्षिणवाहिनी ।। (वामन पुराण)

पश्‍चिम वाहिनी यमुना नदी आणि उत्तर वाहिनी भागीरथी नदी पुण्यकारक आहे. तसे दक्षिण वाहिनी गोदावरी नदीसुद्धा अतिपुण्यदायक आहे. इतके नाशिकमधील पंचवटीतील गोदावरीमधील स्नानाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे.

श्रीगोदा यात्रेचा क्रम

आदौ गत्वा जनस्थाने स्नात्वा च विधिपूर्वनं ।

श्राद्धदानादिकं कृत्वा ततो दृष्टवा जनार्दनम् ।।

संपूज्य श्रीकपालेशं श्रीरामभक्तितत्पर: ।

अष्टतीर्थं तत:कृत्वा यथोक्तफलभाग्भवेत् ।।

गच्छेच स्वगृहं पश्‍चात् एष यात्राक्रम: स्मृत:।

समुल्लंघ्य यो गच्छेत्तस्य यात्रा तु निश्‍फला ।। (स्कंद पुराण)

अर्थात, जनस्थान म्हणजे नाशिकमध्ये गोदावरीमध्ये विधीपूर्वक स्नान, दान आणि श्राद्ध पिंड दानादी विधी केल्यावर पंचवटीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र, कपालेश्‍वरचे दर्शन आणि पूजा करावी. तपोवनमधील अष्टतीर्थ यात्रा केल्यावर घरी परतावे. यात्रेचा हा क्रम पूर्ण न केल्यास यात्रा निष्फळ होते, असे स्कंद पुराणात नमूद आहे.

Ramtirtha
Chandra Grahan 2022 : ग्रहण सुटताच रामतीर्थावर स्‍नानासाठी गर्दी

पद्मनगर, त्रिकंटक, जनस्थान !

सत्ययुगात नाशिकला ‘पद्मनगर’ म्हणून संबोधले गेले. सुंदरनारायण येथे ब्रह्मदेवांनी तपश्‍चर्या केल्याचा उल्लेख पुराणात आहे. त्रेतायुगात ‘त्रिकंटक' म्हणून नाशिकला ओळखले जायचे. प्रभू रामचंद्र यांनी खर, दूषण, त्रिशिरा या राक्षसांचा वध केल्याचा त्यासाठी पुराणात संदर्भ आहे. नाशिकमधील आता तिवंधा या नावाचा भाग गोदावरीच्या तीरावर आहे. महर्षी योगेश्‍वर याज्ञवल्क यांना घेऊन जनक राजाने १४ वर्षे राहून यज्ञ केल्याने नाशिकला ‘जनस्थान’ असेही संबोधले जाते.

दक्षिण वाहिनी गोदावरीविषयक ठळक नोंदी

- दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा आदी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून दहा किलोमीटरवर व समुद्रापासून ८० किलोमीटर अगोदर समुद्रात संगम होण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी आणि वसिष्ठा नदी म्हटले जाते

- गोदावरी नदीच्या उगमापासून दक्षिण तीराने संगमापर्यंत आणि नरसापूरपासून उत्तर तीराने त्र्यंबकेश्‍वरपर्यंतच्या तीन हजार ६०० किलोमीटरच्या प्रदक्षिणेला गोदावरी परिक्रमा, असे संबोधले जाते

- महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात गोदावरीला जीवन वाहिनी म्हटले जाते. नांदेडला गोदावरीचे नाभी स्थान म्हणून ओळखले जाते. कुंभमेळ्यात नांदेडच्या नंदी आणि उर्वशी तट येथे स्नानाचे महत्त्व आहे

"अष्टांगतीर्थ महत्त्व सांगताना गोदावरीच्या कंठ प्रदक्षिणेचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. ‘रामतीर्था‘पासून प्रदक्षिणेला सुरवात करून पुन्हा ‘रामतीर्था‘वर संपवणे याचा त्यात समावेश आहे. यावरून ‘रामतीर्था‘चे महत्त्व अधोरेखित होते."

- शांतारामशास्त्री भानोसे (स्मार्त चूडामणी, नाशिक)

"गंगा गोदावरी तीरावर श्राद्धादी विधी करण्यासाठी आलेल्या यजमानांच्या नोंदी पुरोहितांकडून केल्या जातात. त्यास ‘नामवळ्या’ असे म्हटले जाते. श्रीक्षेत्र नाशिक ‘रामतीर्थ’, असा उल्लेख आमचे पूर्वज गंगागुरू महादेव शंकर पाराशर यांच्या वंशावळीच्या नोंदीमध्ये आहे."

- नितीन पाराशरे (पुरोहित, नाशिक)

Ramtirtha
Chandra Grahan 2022 : ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमी चंद्रगहणाच्या आविष्कारापासून वंचित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.