Nashik: सैन्य दलातील जवान हेमंत देवरेंचे सिलिगुडी येथे निधन; नाशिकमध्ये आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

इंदिरानगरच्या नागरे मळ्यातील रहिवासी नायक हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांचे रविवारी (ता. ४) हृदयविकाराने निधन झाले.
army man Hemant Deore
army man Hemant Deoreesakal
Updated on

इंदिरानगर : सिलिगुडी (पश्चिम बंगाल) येथे भारतीय सैन्य दलाच्या एव्हिएशन विभागात कार्यरत असलेले येथील इंदिरानगरच्या नागरे मळ्यातील रहिवासी नायक हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांचे रविवारी (ता. ४) हृदयविकाराने निधन झाले.

या घटनेने देवरे परिवारावर शोककळा पसरली असून, कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. ६) येथे नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्री. देवरे मूळचे नेर (ता. धुळे) येथील असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते इंदिरानगरमध्ये स्थायिक आहेत. (Army jawan Hemant Deore from Ner passed away in Siliguri Funeral in Nashik today in state ceremony)

मंगळवारी (ता. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडिगो एअरवेजच्या विशेष विमानाने सिलिगुडी येथून त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर नेण्यात येणार असून, तेथून सायंकाळी आठपर्यंत इंदिरानगर येथील त्यांच्या ‘वरदसाई’ बंगल्यावर आणण्यात येईल, अशी माहिती त्यांचे सहकारी सुभेदार मनोज जुन्नरकर यांनी दिली आहे.

हेमंत देवरे तेथील ऑफिसर्स मेसमध्ये शेफ म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील यशवंत देवरे हेदेखील माजी सैनिक असून, पत्नी वंदना इंदिरानगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

हेमंत यांचे वडील यशवंत देवरे यांना रविवारी (ता. ४) दुपारी सुभेदार जुन्नरकर यांनी दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानुसार हेमंत यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला असून, त्यांना सिलिगुडी येथील आर्मी रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

या घटनेने देवरे कुटुंब हादरले. हेमंत यांच्या पत्नी वंदना सध्या सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. सर्वच जण चिंतेत असतानाच पाचच्या सुमारास सुभेदार जुन्नरकर यांनी फोनद्वारे हेमंत यांना वाचवू शकलो नाही, ही दुःखद बातमी दिली आणि देवरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

आई, पत्नीसह सर्वांनी हंबरडा फोडला. ठाणे येथे राहणाऱ्या हेमंत यांच्या भगिनी रूपाली आणि मेहुणे कुणाल एंडाईत हेदेखील रात्री येथे पोचले. सैन्य दलातील उच्च अधिकाऱ्यांनी त्यांचे सिलिगुडी येथे अंत्यदर्शन घेतले.

ठाणे येथे राहणाऱ्या त्यांच्या चुलत भगिनी हर्षदा आणि मेहुणे पवन पाटील हे त्यांचे पार्थिव नेण्यासाठी सिलिगुडी येथे पोचले आहेत. मंगळवारी (ता. ६) नाशिक येथे पार्थिव पोचल्यानंतर सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हेमंत यांची कन्या लावण्या दुसरीत, तर चार वर्षांचा मुलगा वरद बालवाडीत आहे.

army man Hemant Deore
Nashik ISIS Connection: इसिसला ‘फंडिंग’प्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी; सिरियातील महिलेला पैसे दिल्याचे पुरावे न्यायालयास सादर

धुळे जिल्ह्यातील नेर येथील देवरे कुटुंब २००० मध्ये नाशिक येथे स्थायिक झाले. वडील यशवंत देवरे यांनी सैन्यात असताना २२ वर्षे सेवा बजावली आहे. श्रीलंकेमधील १९८६ च्या शांती सेनेंतर्गत राबविण्यात आलेल्या ऑपरेशन पवन आणि २००० ला कारगिल येथे देखील त्यांची पोस्टिंग होती.

सैन्यातील सहा विविध मेडल्स त्यांनी मिळविले आहेत. सातवीपर्यंत वडिलांसोबतच फिरत राहिल्याने आर्मी स्कूलमध्ये शिक्षण झाल्याने साहजिकच हेमंत यांना देखील आर्मीबद्दल मोठे आकर्षण होते.

आठवीला सातपूर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात हेमंत यांनी प्रवेश घेतला. दहावीनंतर धुळ्याच्या एसएसव्हीपीएस मध्ये तंत्रनिकेतन महाविद्यालयात त्यांनी ऑटोमोबाईलमध्ये पदविका पूर्ण केली आणि सातपूरच्या शिरीन ऑटोमध्ये नोकरीस लागले.

मात्र सैन्याकडे ओढा असल्याने २०११ ला देवळाली येथील सैन्य भरतीतून त्यांची रायफल मॅन म्हणून नियुक्ती झाली. त्यातही त्यांच्यातील शेफला आवश्यक असणारे गुण हेरून अधिकाऱ्यांनी त्यांना बेंगळुरू येथे शेफच्या खास प्रशिक्षणासाठी पाठविले. त्याच्यानंतर ते एव्हिएशन खात्यात ऑफिसर्स मेसमध्ये शेफ म्हणून कार्यरत होते.

काल सकाळी नऊला नेहमीप्रमाणे व्हिडिओ कॉल करून ते सर्वांशी बोलले होते. तत्पूर्वी आई, वडील जगन्नाथपुरी येथील यात्रेला गेले होते. त्यांना भेटण्यासाठी १५ डिसेंबरला ते वार्षिक सुटी घेऊन नाशिक येथे आले होते. मागील आठवड्यात २७ जानेवारीला ते पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी गेले होते.

army man Hemant Deore
SAKAL Impact: मालेगाव वीजचोरीच्या समूळ उच्चाटनासाठी स्वतंत्र पथक! गृह मंत्रालयाची दखल; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.