समाजमन : आपले भले चिंतणारी व्यक्ती गुरूसमानच..!

Latest Marathi Article : आपल्या मनातील भावना हक्काच्या व्यक्तीजवळ व्यक्त करावी, असे प्रत्येकालाच मनोमन वाटते.
guru purnima
guru purnima esakal
Updated on

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

आपल्या मनातील भावना हक्काच्या व्यक्तीजवळ व्यक्त करावी, असे प्रत्येकालाच मनोमन वाटते. ती व्यक्ती कोणीही असू शकते. मानवी नातेसंबंधांमध्ये जी नाती निर्माण केली आहेत, त्यामधील कुणीही असू शकते. मात्र ज्यांच्याजवळ आपण व्यक्त होतो, ते नाते अत्यंत महत्त्वाचे असते. कारण त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद, सल्ला याबद्दल आपल्याला प्रेम, आदर, सन्मान तर असतोच; पण जी व्यक्ती आपल्या भल्यासाठी व आपले हित कशात आहे, हे सांगण्यासाठी काही प्रसंगी ठणकावून आणि अपवादात्मक परिस्थितीत कान धरूनही आपल्याला समज देते व ती आपल्याला मान्य होते. (article by author adv nitin thackeray on person who cares for his welfare is like guru)

खऱ्या अर्थाने अशी व्यक्ती मग ती कुणीही असो, ती आपल्यासाठी गुरूसमानच असते. कोणत्याही व्यक्तीच्या यशासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरू असणे आवश्यक आहे. कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे, ‘गुरू बिन घोर अंधेरा’ म्हणजे आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात जगाला ओळख करून देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे गुरू...

यशस्वी जीवनात गुरूचे महत्त्व

आपली गुरू-शिष्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना ब्रह्मा, विष्णू, महेश ही पदवी देऊन सर्वोच्च स्थान दिले आहे. प्रत्येक मुलांचा शिक्षक हा त्याचा चांगला मार्गदर्शक असतो. पौराणिक काळापासून ते अगदी अलीकडच्या डिजिटल युगापर्यंतसुद्धा अशी अनेक नावे आहेत, की जी गुरू-शिष्य म्हणून सर्व क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या यशस्वी जीवनाच्या योगदानामध्ये गुरूचे महत्त्व अधोरेखित आहे.

सुखकर जीवनाचे मार्गदर्शन

माणसाच्या जीवनात अनेक नाती असतात. काही रक्ताची, तर काही त्यापेक्षा घट्ट असतात. त्यातीलच एक नाते म्हणजे मैत्रीचे, तर दुसरे गुरू-शिष्याचे. मैत्रीच्या नात्यामुळे जीवन सुखकर होते, तर गुरू आपल्या जीवनाला खरा अर्थ देतात. गुरू आपल्या शिष्याला केवळ शिक्षाच प्रदान करत नाही, तर त्याला सुखकर जीवन जगण्याचे मार्गदर्शनही करत असतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यास पौर्णिमा’ असे म्हटले जाते. वेद व्यासांना प्रथम गुरूचा दर्जा देण्यात आला आहे.(latest marathi news)

guru purnima
समाजमन : उद्योग-व्यवसायात प्रवेश करण्यापूर्वी...

कारण त्यांनी संपूर्ण मानवजातीला चार वेदांचे ज्ञान दिले. गुरू म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारी एक आदरणीय व्यक्ती... भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. या दिवशी गुरुपूजन केले जाते. महर्षी व्यास भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक विषयांसंदर्भात महर्षी व्यासांनी महाभारत, पुराणातील ग्रंथात लिहून ठेवले आहे.

आई बाळाची पहिली गुरू

आई ही बाळाची पहिली गुरू असते. उत्तम संस्कार करीत ती बाळाला वाढवीत असते. परमेश्वराला नमस्कार केल्यानंतर आई म्हणून गुरूचे, तर पिता म्हणून त्यांचे द्वितीय स्थान असते. गुरू म्हणजे शाळा, महाविद्यालय, शिकवणी शिक्षक असा नाही, तर गुरू म्हणजे तुमचे भले व्हायला हवे आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखविणारी व्यक्ती. मुलांची पहिली शिक्षिका त्यांची आई असते, जिने जन्मापासून मुलांच्या आचरण, खाण्याच्या सवयी आणि इतर गोष्टींकडे लक्ष दिलेले असते किंवा शिकविलेले असते.

लहानपणापासूनच मुलाला आपल्या कुटुंबात आणि समाजात काय चालले आहे ते समजते आणि नंतर ते शिकते. नंतर गुरू शिष्याला ज्ञानी करून, त्यांना सुसंस्कृत बनवितात ज्याने त्यांच्यात लपलेले व्यक्तिमत्त्व उलगडते. गुरू आपल्या शिष्याला जीवनात पुढे जाण्यासाठी, अडचणींना तोंड देण्यासाठी आणि निर्धारित ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतात.

guru purnima
समाजमन : मतदानाचा पवित्र हक्क बजावा!

शिक्षक जडणघडणीमधील गुरूच

व्यक्ती आयुष्यभर शिकत असते. त्यामुळे सर्वप्रथम त्यास उठणे, बसणे व वागणे आई शिकवते व त्यानंतर सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षक हा एक व्यक्तीच्या जडणघडणीमधील महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. माणसाने आयुष्यभर नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहिजेत. तुमच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकच तुमचे शिक्षक असावेत, असे नाही. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षक मिळू शकतो. कधीही भेटू शकते. गुरू म्हणजे ज्याच्याकडून काहीतरी चांगले करायला, शिकायला मिळणे.

प्राचीन काळी गुरूला खूप महत्त्व होते, आजही तेच आहे; परंतु त्या वेळच्या परिस्थितीनुसार गुरू-शिष्य परंपरेची व्याख्या करताना काही बदल झाले आहेत. पूर्वी गुरुकुलात गुरू केवळ शिक्षणच देत नसत, तर शिष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असत. मध्ययुगीन काळातील शिक्षणव्यवस्थेतील विकृती आणि शिक्षणाचा स्तर यामुळे गुरू आणि शिष्य यांच्या नातेसंबंधावरही परिणाम झाला आहे. गुरूचे काम ज्ञान देणे आहे, तर शिष्याचे काम भक्ती आणि श्रद्धेने ते सामावून घेणे आहे.

आयुष्यभर टिकणारे नाते

गुरू आणि शिष्य या दोघांमध्ये समर्पण आणि तळमळीची भावना असणे आवश्यक आहे. त्याशिवाय इच्छित उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत. गुरू-शिष्याचे नाते आयुष्यभर टिकते. आपल्या शिष्याला सांसारिक आणि आध्यात्मिक ज्ञान देण्याबरोबरच, गुरू त्याला नेहमी सुरक्षित ठेवण्याचा आणि वाईट कर्मांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. शिष्य गुरूला आदर देत असो वा नाही, गुरू कधीही आपल्या शिष्याच्या हानीचा किंवा वाईटाचा विचार करत नाही. गुरू-शिष्य परंपरेची सुरवात ज्ञानापासून झाली आणि मोक्षप्राप्तीपर्यंत सुरू राहिली.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

guru purnima
समाजमन : सकारात्मक, संघटित युवाशक्तीचे बळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.