Shravan Somvar : दृष्टी पडता ब्रह्मगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥
नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।
संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगातील ओव्यांमध्ये ब्रह्मगिरीचे माहात्म्य वर्णिलेले आहे. मुळातच, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांना ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान संत गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला अन त्या वेळी भागवत धर्माची स्थापना झाली, असे आध्यात्मिक महत्त्व असलेल्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी (ता. ४) होणारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा निसर्गाची आनंदयात्रा असेल. (article on Brahmagiri Pradakshina on third Monday of Shravan nashik news)
प्रदक्षिणा सर्वार्थाने शरीरातील ऊर्जास्रोत वाढविणारी, मनःशांती देणारी आणि आत्मीक शक्ती वाढविणारी आहे. अशा या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेनिमित्त शिवभक्तांबरोबर त्र्यंबकेश्वरनगरीत हर्षोल्हासात तयारी सुरू आहे.
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ।।
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ।।
तंव तंव पुण्यविशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ।।
केवळ तो शिवरूप काळ त्याच्या पायां पडे हो ।।
त्र्यंबकराजाच्या आरतीतील या आहेत ओळी. सह्याद्री पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी पर्वत पाच शिखरांचा म्हणजे सद्योजात, वामदेव, अघोर, ईशान आणि तत्पुरुष अशा पंचमुखी परमेश्वराचे विशाल स्वरूपात आहे. शिवस्वरूपातील शंकराच्या जटेतील गंगा गौतम ऋषींनी शंकर उपासनेतून पृथ्वीवर आणली.
म्हणूनच गोदावरी नदी ही गौतमी गोदावरी अथवा गौतमीगंगा म्हणून ओळखली जाते. पर्वतावरून उगम होणारी गोदावरी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीमध्ये सागरात विलीन होते. या पर्वतावरून वैतरणा नदीचा उगम होतो, की जी मुंबापुरीची तहान भागविते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रदक्षिणेचे दोन प्रकार
श्रावणात निसर्गाचे विहंगम रूप डोळ्यांना, मनाला सुखावते. प्रदक्षिणेसाठी आल्हाददायक वातावरण असते. प्रदक्षिणेमुळे आत्मीक आनंद आणि धार्मिक पूजा केल्याचे दुहेरी समाधान मिळते. प्रदक्षिणा मार्गात छोटी मंदिरे आणि तीर्थे आहेत. काळाच्या ओघात ती काही ठिकाणी नष्ट झाली आहेत. तरीही तीर्थावर मार्जन व दर्शन करून प्रदक्षिणा पुढे सरकत असते. मोठी प्रदक्षिणा ४० किलोमीटरची, तर छोटी प्रदक्षिणा २० किलोमीटरची असते.
पूर्वी मोठे जंगल आणि पायवाटेवरून पडणारा सततचा पाऊस अशा वातावणात प्रदक्षिणा न थकता व्हायची. आता गौतमी ऋषी मंदिरापर्यंत डांबरी रस्ता आणि तेथील पायऱ्या संपल्यावर त्र्यंबकेश्वर रस्त्याला लागून पक्का रस्ता करण्यात आला आहे.
१९९०-९१ पर्यंत भाविक संपूर्ण श्रावण मासात प्रदक्षिणा करीत असत. आता श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेसाठी आदल्या दिवसाच्या सायंकाळपासून गर्दी सुरू होते. रात्रभर प्रदक्षिणा केली जाते.
खरे म्हणजे, आरोग्याला झेपेल अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालणे अपेक्षित आहे. प्रदक्षिणा घालत असताना हळूहळू चालायला हवे.
प्रदक्षिणेवेळी स्वतःसाठी आवश्यक पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ सोबत ठेवायला हवेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, स्वतःला आरामात चालता यावे एवढेच साहित्य सोबत घेणे गरजेचे आहे. औषधोपचार सुरू असलेल्यांनी नेहमीची औषधे सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे.
प्रदक्षिणा रस्त्यावर छोट्या झोपड्यांच्या वस्त्या आहेत. इथले रहिवासी चहा-पाणी, नाश्ता अथवा सरबत विकतात. त्यांना याच काळात रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यांच्या वस्तू घेण्यातून त्यांना हातभार लावला जातो. मोठ्या प्रदक्षिणा मार्गात वैतरणा नदीच्या पात्रातून जावे लागते. तेथे जाणकार वाटाड्या नेणे आवश्यक असते.
ब्रह्मगिरी पर्वतरांगेच्या मागील भागात मोफत साबूदाण्याची खिचडी, चहा, केळीचे वाटप होते. भाविकांनी एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवायला हवी, ती म्हणजे, प्लास्टिक पिशव्या, द्रोण, पत्रावळ्या, चहाचे कप फेकून हिरव्याकंच निसर्गराजीला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.