इंदिरानगर (जि. नाशिक) : वय अवघं तेरा वर्षे, नाव समर्थ ईश्वर जाधव (इयत्ता आठवी ) नावात ईश्वर असला तरी ईश्वराच्या कृपेने मात्र या बालकाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. (as parents not able to work 13 year old boy selling matki on cycle everyday for entire family income nashik news)
घरात संधीवात आणि मधुमेहाने पीडित वडील त्यात आजार बळावल्याने कोणताही काम धंदा करू शकत नाही. बालपणापासून मूकबधिर असल्याने आई अनिता यांच्या हातालादेखील काम मिळणे अशक्य. सोबत तोल जाऊन पडल्याने कंबरेची शस्रक्रिया झाल्याने घरातच असलेली म्हातारी आजी पुष्पाबाई आणि सातवीत शिकणारा लहान भाऊ स्वामी.
ज्या वयात सर्वसामान्यांची बालक खेळतात, बागडतात, पाहिजे ते करतात, हट्ट करून आई- बाबांकडून हवं ते मागून घेतात. त्याच वयाच हे लेकरू मात्र सायकलद्वारे दररोज १५ ते १६ किमी गल्लोगल्ली फिरून मटकी आणि इतर उसळी विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर नावाप्रमाणेच म्हणजे ‘समर्थ’ पणे अख्ख्या कुटुंबाचे ओझे आपल्या चिमुकल्या खांद्यावर घेऊन जगण्याची लढाई लढत आहे.
शिवाय घरातल्या सर्वांनाच जगवत आहे. पाथर्डी गावातील मनपा शाळा क्रमांक ८७ मध्ये छोट्या भावासह स्वतःचेदेखील शिक्षण जिद्दीने घेत आहे. एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी असं हे वास्तव घेऊन हा बालक दररोज पाथर्डी फाटा भागातील नरहरीनगर येथील घरातून निघून सायकलीवर पायपीट करून उसळ विकतो.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
त्यातून दररोज मिळणारे सरासरी १५० रुपये आणि दर महिन्याला आई वडिलांना मिळणारी अपंग आणि आजीला मिळणाऱ्या विधवा पेन्शनचे मिळणारे ३ हजार अशा साधारण सात हजारात तो संपूर्ण घर चालवत आहे.
मूळचे धुळे येथील शेलारवाडीचे हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये आहे. तब्येत चांगली असताना श्री ईश्वर जाधव सिटी सेंटर मॉल येथे कामाला होते. एकत्रित असतानाचे स्वतःचे घरदेखील आहे. मात्र पुढे मधुमेहाने सुरवात झाली त्यात संधिवात झाला आणि काम थांबले. मग शाळेत जाणाऱ्या समर्थने पर्याय सुचवला आणि घरात मटकी, हरभरा, वाटाणे या उसळी आणायच्या दोन दिवस भिजत घालायच्या.
मोड आली की सायकलवर पाटी ठेवून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आवाज बारका असल्याने मग आवाज देण्यासाठी एक भोंगादेखील विकत घेतला. घर एकत्र कुटुंबातील होते. मात्र ते काकूंच्या नावावर आहे. त्यात काकांचे निधन झाल्याने काकूदेखील आता घर खाली करून देण्यासाठी तगादा लावत असल्याने गेल्या सात वर्षांपासून कोर्टात ही केस सुरू आहे.
त्यासाठी लागणारा पैसा वेगळा. सध्या वडिलांना तीन वेळा इन्शुलिन द्यावे लागते. त्याचा आणि इतर औषधांचा सुमारे पाच हजार रुपयांचा त्यांचा महिन्याचा खर्च आहे. उरलेल्या दीड- दोन हजारात हे कुटुंब कसेबसे दिवस ढकलत आहे.
सायकल चोरीची भीती
सकाळी अकरा वाजेपर्यंत गल्लोगल्ली फिरून उसळ विकून आल्यानंतर तीच उसळ मीठ मिरची लावून खायची आणि लहान स्वामीला घेऊन पायी दोन किलोमीटर पाथर्डी गावात शाळेत जायचे. पूर्वी शाळेतून एका विद्यार्थ्याची सायकल चोरीला गेल्याने आपली सायकल चोरीला जाईल या भीतीने दोघे भाऊ पायीच शाळेत जातात.
सायकल चोरीला गेली तर आहे ते उत्पन्नाचा साधन देखील थांबेल अशी भीती त्यांना आहे. शाळेत मिळणारा पोषण आहार हेच त्यांचे मग दुपारचे जेवण. सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर घरी आले की सहा वाजता परत सायकलीवर समर्थ उसळ विकण्यासाठी निघतो.
कधीकधी छोटा स्वामी देखील त्याच्यासोबत जातो अथवा जवळपासच्या भागात ही उसळ विकतो. नऊ वाजता घरी आल्यानंतर आलेले पैसे आजीकडे द्यायचे त्यातून काही पैसे पुढच्या खरेदीसाठी ठेवायचे आणि उरलेल्या पैशातून इतर नियोजन करायचे असा दररोजचा दिनक्रम ठरलेला.
एकही दिवस खंड नाही
रात्री साडेअकरा वाजेपर्यंत शाळेचा अभ्यास आदी बाबी करायच्या आणि झोपी जायचे. यात एकही दिवस खंड पडत नाही. सणवार आले की मग ही उसळही विकली जात नाही. दररोज एवढी सायकल चालवल्याने पायांना कधीकधी सूज येते.
मग रात्री आई किंवा आजी तेलाने पायांना मालिश करून देतात. अडचणी भरपूर आहेत. मात्र भावासह स्वतःही शिकून मोठे व्हायचे ही जिद्द त्याने मनात बाळगली आहे. घरातील सर्व प्रकारची बिल भरणे, बँकेतील पेन्शन, घरातल्यांना दवाखाना आदी सर्व कामे समर्थच करतो.
"आजी सांगते बाळा दिवस थांबून नाही राहात. दिवस पालटतात, कष्ट करायचे, चांगलं माणूस व्हायचं आणि खूप शिकायचं. त्यामुळे स्वतःसह लहान भावालाही शिकवायचे आहे. शिकून आणि मेहनत घेऊन लहान भावाला सैन्यामध्ये, तर मला पोलिस अधिकारी व्हायचं असं स्वप्न बघितलं आहे." - समर्थ जाधव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.