"अगा, सावळ्या पांडुरंगा... तू कानडाऊ असूनही अखिल महाराष्ट्राची ओढ आहेस. कुठल्यातरी काळी, कुठल्यातरी युगात तू येथे आलास. तुझ्या भक्ताला, पुंडलिकाला भेटण्यासाठी. भक्त भगवंताला शोधायला जातो. तहानेला नदीजवळ जातो, ही जगाची रीत. पण इथे तर विपरीतच घडले. नदीलाच तहान लागली. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा.
पण त्या ‘पुंड’ पुंडलिकाला त्याचे काहीच वाटले नाही. त्याने फक्त वीट फेकली. तुला उभे राहण्यासाठी अन् तू पण चटदिशी तिच्यावर उभा राहिलास. एका भक्ताने भगवंताला पद दिले. तू धृवाला दिलेल्या अढळपदापेक्षाही ही वीट अढळ होती. असं आश्चर्य, उभ्या जगात फक्त पंढरीतच घडलं, म्हणूनच ‘पंढरीचा महिमा वर्णावा किती!" - डॉ. नीरज देव, जळगाव
(ashadhi ekadashi special article by dr neeraj deo nashik)
चंद्रभागेच्या तीरावर पंढरी आहे आणि पंढरीत कटीवर हात ठेवून तू उभा आहेस. जणू सुचवितोस साऱ्या जगाला, की हा भवसागर केवळ कंबरेएवढाच आहे. सहज पार करू शकाल. इथे बुडण्याचे भय नाही.
मी तीरावरच उभा आहे. या तुझ्या आश्वासनामुळेच भक्तांचे मेळेच्या मेळे हजारो वर्षांपासून ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ म्हणत, गर्जत पंढरीला येतात. प्रत्यक्ष चक्रपाणीच पंढरीला येऊन राहिल्यावर वैकुंठ दुसरे कुठे असणार हो! खरे सुख नि वैभव पंढरीतच.
या द्वारकेच्या राण्याला भेटण्यासाठी ज्ञानियाचा राजा ‘अमृतातेही पैजा जिंकीत’ तुझ्या दरबारी आला. तुझे सावळं रूप पाहून त्यालाही सुख वाटले. वाटले पसायदान फळा आले. त्याने सिद्धांत मांडला
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
त्याने मुक्ती चारी साधियेल्या ।
त्याच्यासोबत त्याची तीन भावंडेही होती. त्यांना घेऊन तू कोणालाही दिसणार नाही, अशावेळी फिरायला निघालास. तुम्हा पाचांचे ते पावन रूप जनीला पाहायला मिळालं.
निवृत्ती हा खांद्यावरी। सोपानाचा हात धरी ।
पुढे चाले ज्ञानेश्वर। मागे मुक्ताई सुंदर ।।
ज्ञानेश्वराच्या; भक्ताच्या मागे मागे फिरणाऱ्या तुला-भगवंताला तिने रंगेहाथ पकडला. म्हणून तर तिला चूप करण्यासाठी तू तिच्यासोबत दळायला बसत होतास. तिथेच तुझा लाडका नामदेवही राहात होता.
त्याने तर लहानपणीच तुझ्याजवळ हट्ट धरला, ‘एक तरी घे घास विठ्ठला!, एक तरी घे घास विठ्ठला!’ तेव्हा त्या नाम्याच्या बालहट्टापोटी तू जेवलास. अशी घटना अन्य क्षेत्री नाही. त्याच नाम्यासाठी तू राऊळही फिरविलेस. केवळ भक्त दिसावा म्हणून । धन्य त्यांच्या भक्तीची अन् धन्य तुझ्या भक्तवत्सलतेची.
अचानक सुलतानी संकट कोसळलं अन् भयाण काळरात्र पसरली. पैठणचा एकनाथ ‘दार उघड बये दार उघड’चा आकांत करत तुळजापुरी जायला निघाला. पण अंती तुझ्यापाशीच येऊन त्याचे चरण थांबले. तुला पाहूनच तो स्तब्ध झाला अन् त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले,
‘माझे माहेर पंढरी । आहे भिवरेच्या तीरी।
बाप आणि आई । माझी विठ्ठल-रखुमाई।।
मंगळवेढ्याचा चोखामेळा तुझ्या दर्शनाला आला. लोकांनी त्यास हेटाळले, तसा तो गर्जून त्यांना म्हणाला,
चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा।।
तू त्यांचा चोखट भाव तत्काळ जाणलास. त्याच्यासाठी ती अढळ वीट तू क्षणभर सोडलीस, नव्हे ! नव्हे ! विटेसह त्याला भेटायला गेलास. अरे ! त्या विटेमुळेच तर तुझी किंमत. भक्तासाठी कासावीस होणारा तुझ्यासारखा तूच.
शेख महंमदही तुझं रूप पाहून बुतशिकनता भुलून बुतपरस्ती करू लागला. अल्लाह से तौबा करीत तुझाच ‘मुरीद’ बनला. उसळून तो म्हणाला।
शेख महंमद अविंध । त्याचे हृदयी गोविंद।
राम ज्याचा दास तो रामदासही तुझ्या दरबारी आला. पण कटीवर ठेवलेले तुझे हात पाहून नाराज झाला. त्याबरोबर तू हातात धनुष्यबाण घेऊन त्याला आश्वासन दिलंस, की टाळ कुटणारे हे वारकरीच उद्या तलवारकरी होतील. सुलतानी संकट विरून जाईल. त्याबरोबरच ‘जेजे स्वप्नी देखिले। ते ते तैसेचि घडले’ची अनुभूती आलेला रामदास कुबडी नाचवत गर्जला-
ज्याचा जैसा भाव त्याला तैसा पंढरीराव!
केवळ उपकारापुरता उरलेला देहूचा वाणी तुझी बाजारपेठ मांडायला आला. त्याची अमोल अभंगवाणी त्याने पंढरीत पेरली. तुला पाहून तो अन् त्याला पाहून तू भावविभोर झालात. तुझा तो सर्वांत लाडका भक्त होता. पुंडलिकापेक्षाही पुंड असलेला हा भक्त नाचत नाचत गाऊ लागला-
आधी होता सत्संग । तुका झाला पांडुरंग ।।
त्याबरोबर सर्व विसरून तूपण त्याच्या कीर्तनाचे रंगी नाचू लागलास. सारे वारकरी देहभान विसरून गाऊ लागले. टाळ-मृदंगाच्या घोषात गर्जू लागले...‘ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम...’ तेव्हापासून हाच जयघोष करीत सारेजण तुझ्याकडे येतात.
एखाद्याला वाटेल, काय हा उद्दामपणा? पंढरीला जाताना पंढरीनाथाऐवजी ‘ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष? त्यांना काय ठाऊक, की एखाद्या आईकडे जर काही काम असेल तर तिची स्तुती न करता तिच्या मुलाची करावी, म्हणजे काम नक्की होते.
हेच तर महाराष्ट्रातील चाणाक्ष वारकऱ्यांनी अचूक हेरले, म्हणून तर तुझ्या दोन अतिलाडक्या लेकरांच्या नावाने साद घालीत ते पंढरी दुमदुमून सोडतात. जगात असे कोणतेही क्षेत्र नसेल, की जेथे भगवंतापेक्षा त्याच्या भक्तांचाच जयजयकार होतो.
अगा पांडुरंगा, आज देवशयनी एकादशी. आज तुम्ही झोपणार, जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा सारी सृष्टी हिरवीगार झालेली असेल. पिकं चांगली खांद्यापावेतो, माथ्यापावेतो वाढलेली असतील. भोळाभाविक म्हणेल, बा विठ्ठला! किती अगाध तुझी कृपा?’ तेव्हा हसून तू म्हणशील, मी तर झोपलेलो होतो. हे तर तुझ्याच कष्टाचे फळ !
कटीवर हात ठेवून, यशाचे श्रेय भक्ताला देण्याची वत्सल लबाडी करणाऱ्या पांडुरंगा! आज लाखोलाखो वारकरी नाचतनाचत, गातगात पंढरीला तुमच्या दर्शनासाठी जमणार. ज्यांना ज्यांना आज तुमच्या गोजिया रूपाचे दर्शन घडेल, त्यांना त्यांना कृतकृत्य वाटेल. त्यांची वारी सफल होईल. पण आमच्यासारखे अभागी मात्र पंढरीपासून दूर तुला आठवत बसणार अन् मनातल्या मनात पुटपुटणार
परब्रह्मलिड्गम भजे पांडुरंगम्।
मी व्यथित अंतःकरणाने डोळे मिटून अंतरंगात डोकावले आणि मी चकितच झालो. माझ्या हृदयातही एक वीट होती आणि सावळा विठ्ठल तीवर उभा होता. खरोखर त्या पुंडलिकाने कमाल केली. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अशी एकेक वीट जन्मतःच फेकली आणि तूपण तत्परतेने तीवर उभा राहिलास. प्रत्येकाच्या हृदयात तुझीच प्रतिमा ठसलेली. कटीवर हात ठेवूनही प्रत्येकाचं हृदय तूच चोरलेलं । खरंच
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ।।
देखिली पंढरी देही, जनी, वनी। एका जनार्दनी वारी करी ।।
ही एकट्या नाथांचीच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राची अनुभूती आहे. बा पांडुरंगा ! अवघ्या महाराष्ट्राची अनुभूती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.