मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : रणरणत्या उन्हाने जिवाची काहिली होत असताना, शेतकऱ्यांना डाळिंब (Pomegranate) फळबागा जगवणे जिकिरीचे बनले आहे. वाढत्या तापमानात फळबाग वाचवण्यासाठी दाभाडी येथे डाळिंबाच्या झाडांना चक्क जुन्या साड्यांनी नटवून सावलीची व्यवस्था केली आहे. अल्पदरात सहज उपलब्ध होणाऱ्या जुन्या साड्यांमुळे हे नवे सुरक्षाकवच लक्षवेधी ठरले आहे. वाढत्या तापमानापासून डाळिंब बागा जगवण्याच्या या अभिनव प्रयोगाचे कौतुक होत आहे.
विविध रोगराईच्या आक्रमणाने कसमादे भागातून डाळिंब बागा द्रुतगतीने (Quickly) हद्दपार होत आहेत. कसमादे भागात सध्या प्रचंड तापमान वाढले आहे. एप्रिल व मे महिन्यात सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमान दिसून येत आहे. वाढत्या तापमानात आंबेबहार हंगामातील डाळिंब बागा जगवण्यासाठी उत्पादकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दाभाडी येथील युवा शेतकरी सुरेश यशवंत निकम याने मालेगाव कॅम्प रस्त्यावरील डाळिंबाच्या झाडांना चक्क जुन्या साड्यांचे पांघरून घातले आहे. मालेगावी ठोक बाजारात प्रत्येकी २० रुपये दराने जुन्या साड्या खरेदी केल्या आहेत. तीनशे झाडांची डाळिंबाची बाग सध्या विविधरंगी साड्यात नटली आहे. साड्यांच्या सावलीत उन्हाच्या तडाख्यातून कोवळी फळे लहान मुलांगत जपली जात आहेत. फळांवर उन्हाचे चट्टे पडू नयेत, म्हणून महागडी व्यवस्था करण्यापेक्षा हा माध्यमार्ग निवडला आहे. वादळी वाऱ्यात साड्या उडून जाऊ नये, म्हणून झाडावर अंथलेलेल्या साडीच्या चारही टोकांना दगड बांधले जातात.
जुन्या साड्यांना वाढली मागणी
मालेगावला दर गुरुवारी जुन्या साड्यांचा विक्रीचा बाजार भरतो. परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जुन्या साड्या मालेगावातील रस्त्यांवर खरेदी-विक्री होतात. घरोघरी भांड्यांच्या बदल्यात खरेदी केलेल्या या साड्या येथील बाजारात विक्री केल्या जातात. लहान मोठे दोर बनवणे, पाय पुसणे यासह टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी जुन्या साड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मालेगावच्या गुरुवारच्या या बाजारात आता डाळिंब बागधारक उन्हाळ्यातले उत्पादक नवीन खरेदीदार म्हणून फिरकू लागले आहेत. अवघ्या १५ ते २० रुपयांत या साड्या मिळतात. एका झाडाला एक साडी लागते. या प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
"डाळिंब बागांना उन्हापासून वाचवणे कठीण बनले आहे. आंबे बहाराची नाजूक फळे उन्हाने करपली, तर बाजारभाव मिळणार नाही. उत्पादन खर्च वाया जाण्याची भीती असल्याने जुन्या साड्यांचे सुरक्षा कवच घातले आहे."
-सुरेश निकम, शेतकरी, दाभाडी
"उन्हापासून संरक्षण उपाय केल्याने फळांना चकाकी येते. उत्पादक आर्थिक परिस्थितीनुसार फळाला कागदाचे आवरण, झाडावर साड्या, नेटच्या कापडाचे पांघरूण घालत आहेत. त्यामुळे रोग प्रादूर्भाव कमी होऊन झाडाची क्रयशक्ती व आर्द्रता वाढते."
-सतीश भामरे, डाळिंब निर्यातदार व्यापारी व उत्पादक, दाभाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.