जिद्द : परिस्थितीवर मात करीत सामोडेच्या संगीताताई बनल्या कुटुंबाचा आधार

inspirational story: दोन वेळचं पुरेसं जेवण मिळविण्यासाठी लढाई सुरू होती. मात्र, परिस्थिती नक्कीच बदलेल, या सकारात्मक विचारांवर ती ठाम होती.
Sangitatai Gharate Savale
Sangitatai Gharate Savaleesakal
Updated on

माहेरी सुरू असलेला गरिबीचा प्रवास जणू सासरीही न थांबणारा... रोज मजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता... माहेरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे आठवीतच शिक्षण सुटलं... आयुष्यात चांगले दिवस येण्याची स्वप्ने पाहत होती.

दोन वेळचं पुरेसं जेवण मिळविण्यासाठी लढाई सुरू होती. मात्र, परिस्थिती नक्कीच बदलेल, या सकारात्मक विचारांवर ती ठाम होती.

दिव्यांग पतीसाठी खंबीर साथ देतानाच आठवडे बाजारातील भाजीपाला विक्रीतून कुटुंबासाठी आधार बनल्या, त्या साक्री तालुक्यातील सामोडे येथील रहिवासी संगीताताई घरटे-सावळे.. (backbone of Samode village Sangeettai family overcoming odds inspirational story nashik)

संगीता गोरख घरटे... सासर सामोडे (ता. साक्री), सासर जवळच असलेल्या कोकले (नागाई) येथील... संगीताताईंचे शिक्षण आठवी... अभ्यासात हुशार असूनही आई-वडिलांबरोबर रोज मजुरीकामाचे कष्ट उपसताना आणि माहेरी आधार देताना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले.

वडील जगन्नाथ वामन सावळे यांचे पत्नी जिजाबाई यांच्यासह तीन मुली व मुलगा असे सहा जणांचे कुटुंब. जगन्नाथ सावळे यांच्या कुटुंबात रोज मजुरी केली नाही तर कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, अशी बिकट परिस्थिती होती.

मात्र, अशाही परिस्थितीत कुटुंबाचा गाडा पुढे नेत होते. लहानपणापासूनच कष्टाची सवय असल्याने संगीताताईंचाही सावळे परिवाराला आधार मिळत होता. मात्र, कुटुंबाची जबाबदारी लवकर पार पाडावी म्हणून संगीताताई यांचा विवाह केला. मात्र, कष्ट काही थांबले नाहीत.

संगीताताई यांचा विवाह सामोडे येथील गोरख घरटे यांच्याशी झाला.पती गोरख जन्मतःच एका हाताने अपंग होते. मात्र कुटुंबातील शेतीपासून तर लहानसहान कामात ते मागे नव्हते.

गोरख घरटे पदवीधर असल्याने त्यांनी नोकरीसाठी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. संगीताताईंच्या सासरीही परिस्थिती जेमतेम... शेती तीही नावापुरतीच. माहेरी सुरू झालेला कष्टमय प्रवास इथेही सुरूच राहिला.

सामोडे येथेही रोज शेतात राबून दोन पैसे कमावण्याकडे त्यांचा कल होता. संगीताताई मजुरीवर, पती गोरख हे पदवीधर असूनही गायी, म्हशी सांभाळत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sangitatai Gharate Savale
Inspirational Story : घरीच अभ्यास करत IITची स्वप्नपूर्ती!

वडिलांनी दिला आधार

सकारात्मक विचारांतून पुढे जाताना कुटुंब विभक्त झाले. मुलगा प्रशांत व मुलगी पूनम यांच्यानिमित्त कुटुंबाची संख्या वाढली. कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटलेल्या संगीताताई यांच्या कुटुंबाने दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले.

याच काळात कर्जबाजारीपणामुळे गायी, म्हशी विकाव्या लागल्या. या प्रसंगातून पती गोरख यांच्या पाठीशी त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या.

मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड असल्याने वडील जगन्नाथ यांनी संगीताताई यांना तुटपुंजे भांडवल उपलब्ध करून देत लसूण, अद्रक विक्री करण्यासाठी मदत केली. गावातील अनियमित रोजगारामुळे संगीताताई यांच्यासाठी हा चांगला पर्याय वडिलांनी उभा करून दिला.

पहिल्याच दिवशी सामोडे परिसरात त्यांनी लसूण, अद्रक विक्रीतून १०० रुपयांची कमाई केली. येथूनच खऱ्या अर्थाने घरटे परिवारासाठी संगीताताई यांचा आधार मोलाचा ठरला.

पती गोरख यांनीही संगीताताई यांची धडपड पाहून दिव्यांगत्व झुगारून देत भाजीपाला विक्री व्यवसायात जमेल तशी मदत करीत संगीताताई यांना प्रोत्साहन दिले.

काटवान परिसरातील गावांचा वाढता विस्तार लक्षात घेऊन संगीताताई यांनी सामोडे गावासह परिसरातील साक्री, पिंपळनेर, दहिवेल आदी ठिकाणच्या आठवडे बाजारांतही लसूण, अद्रक विक्रीबरोबरच भाजीपालाही विक्रीसाठी नेऊ लागल्या.

आठवडे बाजारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या संगीताताई यांना आधार म्हणून पती गोरख यांनीही सामोडे येथील बसस्थानक परिसरात स्वतः थांबून हातगाडीवर भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिला.

परिस्थितीवर केली मात

आयुष्यात गरिबी जणू पाचवीलाच पूजलेली असतानाही कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर एकवेळ खायची भ्रांत कुटुंबावर आलेल्या प्रसंगातही खचून न जाता कुटुंब उभे करतानाच मुलगा प्रशांत घरटेही संगीताताई यांच्या या व्यवसायात मदत करतोय.

भाजीपाला विक्री व्यवसायातील गरज लक्षात घेऊन मुलासाठी वाहन खरेदी करून दिल्याने परिसरात जा-ये करण्याची चांगली सोय झाली आहे.

या व्यवसायानिमित्त पती गोरख, मुलगा प्रशांत, सून भाग्यश्री, मुलगी पूनम, जावई भावेश, बहीण मनीषा नहिरे, मामा दिलीप घरटे तसेच कोकले येथील सावळे व सामोडेतील घरटे परिवाराने दिलेला आधार मोलाचा असल्याचे सांगताना त्यांचे डोळे भरून आले.

Sangitatai Gharate Savale
Inspirational Story : ओल्या नारळाच्या करंजांनी पोचवले चैत्रालीताईंना सातासमुद्रापार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.