Nashik News : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील संगणक प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने मागील पाच ते सहा दिवसांपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे ग्राहकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सहा दिवस उलटूनही ही समस्या सोडविण्यात आली नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Bank transactions stopped for 5 days in Jaikheda Obstacles in getting services Nashik News)
जायखेडा येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. शाखेत जायखेडयासह परीसरातील गावांमधील हजारो ग्राहकांचे खाती आहेत. व्यापारी व शेतकरी आपले आर्थिक व्यवहार या शाखेमार्फत करीत असतात.
त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना, अनुदान, बचत गट व्यवहार, वेतन व निवृत्ती वेतन आदी बाबींसाठी ज्येष्ठ नागरिक व महिलावर्ग तसेच विद्यार्थी याच बँकेवर अवलंबून आहेत. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग, वाढती ग्राहक संख्या यामुळे या बँकेच्या यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
याचा विपरीत परिणाम ग्राहकांच्या सेवेवर होत आहे. यामुळे ग्राहकांना चांगली व तत्पर सेवा मिळण्यात अडथळे येत आहेत.
सध्या सगळीकडे कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना मजुरी व अन्य नियोजनासाठी पैशाची नितांत गरज असतानाच बँकेच्या या अडचणींमुळे मोठी आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच पुढचे दोन तीन दिवस पुन्हा सुट्या येत असल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
एटीएम, पासबुक प्रिटींग मशिन ‘असून अडचण नसून खोळंबा’
या शाखेचे एटीएम मशिनची अवस्थाही ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच आहे. वारंवार मशिन बंद पडणे, त्यात मुबलक पैसे उपलब्ध नसणे ही बाब नित्याची झाली आहे.
तसेच पासबुक प्रिंटिंगचे मशीनही गेल्या दोन वर्षांपासून बंद असून नागरिकांना वेळेवर पासबुक भरून मिळत नाही. पैसे काढण्यासाठी पासबुक विचारले जाते मात्र तेच पासबुक भरण्यासाठी नागरिकांना आपले कामे सोडून रांगेत तास्नतास उभे राहावे लागते.
"बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कधी सर्वर डाऊन तर कधी पैसे नसणे या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. आता तांत्रिक कारणामुळे आर्थिक व्यवहार ठप्प असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कांदा काढणीचे काम सुरू आहे. मजुरांना देण्यासाठी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत."
- नीलेश पाटील, अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी जायखेडा
"काही तांत्रिक कारणामुळे बँकेच्या सुविधांमध्ये अडचण आली होती. मात्र आता शाखेतील सेवा सुरळीत करण्यात आली असून किरकोळ दुरुस्तीचे काम अजून सुरू आहे. पुढील दोन दिवसात सर्व अडचणी दूर केल्या जातील."
- अक्षद जगताप, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र जायखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.