वर्गमित्रांची ती कृती भीमाने पाहिली आणि तो स्वतःला म्हणाला, ‘‘मी खालच्या जातीत जन्मलो असलो, तरी मीही माणूसच आहे ना? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये, असं का वाटतं त्यांना? कोणी शिकवलं, या मुलांना हे अवघड गणित?’’ भीमाने फळ्यावर सम आणि विषम संख्या अगदी अचूक लिहिल्या.
गुरुजींनी त्याला शाबासकी दिली. आपल्या जागेवर परत जाताना भीमा म्हणाला, ‘‘गुरुजी, फळ्यावरचं गणित मला समजलं; पण फळ्यामागचं गणित उमजलं नाही हो. समसंख्यांचा हिशेब मला अचूक जमला पण ‘विषम’ संख्यांचा हिशेब मला उलगडला नाही हो.’’ हा लहानगा भीमा म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! (Basic idea of education Dr Babasaheb Ambedkar article by sachin usha vilas joshi Nashik Latest Marathi article)
गुरुजी वर्गात सम आणि विषम संख्या शिकवत होते. समसंख्या आणि विषमसंख्या कोणती, ते उदाहरणासह समाजवून सांगत होते. गुरुजींनी विचारलं, ‘‘समजलं का सर्वांना?’’ मुलांचं गुरुजींच्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं; त्यामुळे गुरुजी चिडले.
सगळ्या मुलांना शिक्षा करायला लागले. भीमा नावाचा एक विद्यार्थी मात्र बाणेदारपणे गुरुजींना म्हणाला, ‘‘मला गणित समजलं आहे. माझं तर तुमच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. मग मी शिक्षा का म्हणून घेऊ?’’ त्यांच्या या बोलण्याचा गुरुजींना राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘तुला गणित समजलं?’’
‘‘हो गुरुजी.’’
‘‘तुझं लक्ष फळ्याकडेच होतं?’’
‘‘हो गुरुजी.’’
‘‘मग घे हा खडू आणि फळ्यावर सम आणि विषम संख्यांची पाच उदाहरणं लिहून दाखव.’’
गुरुजींनी त्याच्याकडे फेकलेला खडू भीमाने अगदी अलगद झेलला आणि तो फळ्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात वर्गातील सगळी मुलं उठली नि धावपळ करत फळ्याकडे गेली. त्यांनी फळ्याच्या मागे ठेवलेले त्यांचे जेवणाचे डबे तेथून उचलून दुसरीकडे ठेवले.
का? तर भीमाच्या स्पर्शामुळे त्यांचे डबे बाटतील. तो अस्पृश्य म्हणून त्याच्या सावलीमुळे ते दूषित होतील. तत्कालीन विद्यार्थ्यांच्या मनावरही सामाजिक दृष्टिकोनाचा झालेला हा एक वाईट परिणाम होता. वर्गमित्रांची ती कृती भीमाने पाहिली आणि तो स्वतःला म्हणाला, ‘‘मी खालच्या जातीत जन्माला आलो असलो तरी मीपण माणूसच आहे ना? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये, असं का वाटतं त्यांना? कोणी शिकवलं या मुलांना हे अवघड गणित?’’
भीमाने फळ्यावर सम आणि विषमसंख्या अगदी अचूक लिहिल्या. गुरुजींनी त्याला शाबासकी दिली. आपल्या जागेवर परत जाताना भीमा म्हणाला, ‘‘गुरुजी, फळ्यावरचं गणित मला समजलं; पण फळ्यामागचं गणित मला उमजलं नाही हो.’’ समसंख्यांचा हिशेब मला अचूक जमला; पण ‘विषम’ संख्यांचा हिशेब मला उलगडला नाही हो.’’
हा लहानगा भीमा म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला महू गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सकपाळ नि आईचं भीमाबाई. भीमाबाईंचा मुलगा म्हणून त्यांचं नाव ‘भीमराव’ ठेवलं. याच भीमरावाने पुढे भारताच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला. सर्वांना शिक्षणाचा समान हक्क मिळवून दिला. जागतिक पातळीवर समानतेच्या मूल्याला महत्त्व प्राप्त करून दिलं.
पुढे हा शिक्षणव्यवस्थेचा पाया राहिला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हे जीवनसूत्र त्यांनी सर्वांना शिकवलं. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ शिक्षण नाही मिळाली जरी, कुठे काय बिघडलं तरी? हा दृष्टिकोन मुळातच बदला. काही मिळवायचं असेल, तर संघर्ष आणि कष्टाला पर्याय नाही, हे त्यांनी अत्यंत कळकळीने वारंवार सांगितलं आणि स्वतःच्या कृतिशीलतेतून सर्वांना पटवूनही दिलं.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे करोडो उपेक्षित दुर्बल दलितांचं प्रेरणास्थान!
समाजसेवक, राजकारणी, संपादक, दलितांचे उद्धारक, बुद्धिवादी, समीक्षक, अर्थतज्ज्ञ, घटनाकार, संघटनकुशल, इतिहास घडवणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
भारतमातेचे एक महान सुपुत्र! लहानपणी अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरं जात अतोनात जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली. वेळप्रसंगी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला.
एक पाव आणि एक कप कॉफीच्या आधारावर अठरा-अठरा तास अभ्यास केला. अभ्यास बरेच जण करतात; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वैष्टिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय ठरते ती त्यांची व्यासंगी वृत्ती. अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना व्यासंग जमतेच, असं नाही. मुळात असलेल्या विद्वत्तेला अत्यंत सखोल विचार करण्याची लागलेली कष्टप्रद सवय म्हणजे व्यासंग..! त्याची साथ बाबासाहेबांनी कधी सोडली नाही.
म्हणूनच त्यांच्या विद्वत्तेला कायम व्यासंगपूर्णतेची जोड मिळाली आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक उत्तर ते नेहमीच सर्वांगपूर्णतेने निरखू शकले, अजमावू शकले, अमलात आणू शकले. त्यांची झेपच मोठी होती. वृत्ती अजिबातच कूपमंडूक नव्हती. आश्चर्य म्हणजे व्यापक आणि सखोल विचार एकावेळी करू शकण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं.
हेच कौशल्य भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये येणं अपेक्षित आहे. अभ्यासासोबत सामाजिक जाण, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी खोलपर्यंत विचार करणं या गोष्टी देशाचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी गरजेच्या असतात.
अमेरिकेतील कोलंबिया या नावाजलेल्या विद्यापीठातून १९१५ मध्ये एम. ए., १९१७ मध्ये पीएच.डी. आणि त्यानंतर १९२३ मध्ये इंग्लंडमधील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या जगप्रसिद्ध शिक्षण संस्थेतून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ आणि लंडनच्या ‘ग्रेज इन’मधून बॅरिस्टरची पदवी अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करून ते मायदेशी परतले.
ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडात भारतात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांच्यापासून कायदा, इतिहास, मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये भराऱ्या घेऊन त्यांनी मोलाची भर घातली आणि जगभरात त्यांच्या कामगिरीला कृतज्ञतापूर्वक मान्यता मिळत गेली.
भारतातील राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेत त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. अनेकविध क्षेत्रांत त्यांनी अर्थपूर्ण अशी भरीव कामगिरी केली. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्मचक्र प्रवर्तक अशा भूमिकांमधून त्यांनी भारताच्या इतिहासात आपला आगळावेगळा ठसा उमटवला.
त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणणं फार अन्यायकारक आहे, तसे ते होतेच; पण त्यांची कामगिरी तेवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. ते सर्वार्थाने राष्ट्रीय नेते होते. व्यापक मानवी हक्कांचा अवलंब हे त्यांचं उद्दिष्ट होतं. जातीविरहित, वर्गविरहित आणि लोकशाहीप्रणीत नवसमाजाची निर्मिती हा त्यांचा ध्यास होता. तो त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा मूलाधार म्हणूनच डॉ. नरेंद्र जाधव त्यांना ‘आधुनिक भारताच्या सामाजिक सद्सद्विवेक बुद्धीचा मानदंड’ असं म्हणतात.
या सर्व गोष्टींवरून प्रकर्षाने लक्षात येतं, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांनी स्वतः शिक्षणासंदर्भात मूलगामी तत्त्वप्रणाली सिद्ध केली. ती करताना मुळाशी मानवी जगण्याचा आणि मूल्यांचा विचार होता. आंबेडकर आणि आजचं शिक्षण असा जर विचार केला, तर लक्षात येतं, की आंबेडकरांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेला सर्वांत मोठी देणगी कोणती दिली असेल, तर ती म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असं नमूद केलं आहे, की शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे.
त्यांनी स्वतः अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं. न डगमगता, ना थांबता संघर्षाशी दोन हात करत त्यांनी शिक्षणाचा सर्वोच्च पल्ला गाठला. आजही भारतात सर्वांत जास्त शिक्षण घेतलेली व्यक्ती म्हणून त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. बाबासाहेबांच्या या साऱ्या शैक्षणिक प्रवासात इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा सखोल आढावा घेत त्यांच्या सवयीप्रमाणे व्यासंगपूर्ण रीतीने ते मानवी मूल्यांच्या अंमलबजावणीपर्यंत पोहोचले.
डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपण शाळेत शिकतो. माकड ते आधुनिक माणूस हा प्रवास आपल्याला माहीत आहे. आता आपण आधुनिक मानव या अवस्थेत आहोत. यापुढे आपल्याला नैतिक उत्क्रांतीकडे जायचं आहे. त्यासाठी राज्यघटनेत दिलेल्या मूल्यांना महत्त्व द्यायला हवं. विश्वपातळीवर समानता आणि बंधुता असणं गरजेचं आहे.
ही मूल्यं म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. यालाच आता ‘शिक्षण’ म्हणता येईल. मानवी जगण्याच्या मुळाशी ही मूल्यं होतीच. ती विपर्यस्त स्थितीत गाडली गेली होती. ती हुडकून काढून भारतीय राज्यघटनेद्वारे अत्यंत सन्मानपूर्वक संपूर्ण मानव जातीच्या हवाली करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं.
डार्विनच्या उत्क्रांतीपासून नैतिक उत्क्रांतीकडे जायचं असेल, तर त्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना. या राज्यघटेनच्या निर्मितीप्रक्रियेत ते सहभागी झाले, महात्मा गांधींमुळे. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे वैचारिक मतभेद होते तरीही (कायदेमंत्री) लॉ मिनिस्टर पदासाठी त्यांनी डॉ. आंबेडकरांचं नाव सुचवलं. फक्त सुचवलंच नव्हे, तर त्यांच्या नावाचा आग्रह धरला.
समानतेच्या दृष्टीने विचार करणारा प्रथम माणूस म्हणून त्यांनी बाबासाहेबांना निवडलं. म्हणूनच, लहानपणी उपेक्षा सहन करणाऱ्या भीमरावाने पुढे भारताची राज्यघटना लिहिली. त्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा, संविधानांचा बारकाईने अभ्यास केला. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वांत मोठी, लिखित घटना आहे.
घटनेची प्रस्तावना तर फार महत्त्वाची आहे. त्या प्रस्तावनेत एक महत्त्वपूर्ण पृष्ठ समाविष्ट आहे. त्याला ‘उद्देशिका’ ज्याला इंग्रजीत Preamble म्हणतात. विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञेबरोबर पाठ्यपुस्तकात परिपाठासाठी ते समाविष्ट केलेलं आहे. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा यानंतर ही म्हटली जाणं हा त्यामागचा हेतू आहे. पण आज बऱ्याच शाळेत ती म्हटली जात नाही.
‘उद्देशिका’ अशी :
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडवण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना: सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत.
या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. प्रत्येक शब्दाच्या अर्थासाठी एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. विद्यार्थ्यांकडून ती रोज फक्त वाचून आणि पाठ करून न घेता तिचा अर्थ त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. या सगळ्या विचारांच्या मुळाशी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्यं आहेत.
ही सगळी मूल्यं एकविसाव्या शतकाच्या दृष्टीने कमालीची महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थी आता ग्लोबल होत आहेत. जगभरात एकमेकांशी शैक्षणिक पातळीवरून बांधले जातायत. अशा वेळी समता आणि बंधुता हे त्यांच्यासाठी केवळ शब्द राहता कामा नयेत. या शब्दांचा अर्थ कृतियुक्त रीतीने त्यांच्यात झिरपत गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक जागतिक पातळीवर या समानतेच्या मूल्याला सर्वोच्च स्थान दिले आहे. हा शिक्षणव्यवस्थेचा पाया राहिला आहे.
हे आजही किती आवश्यक आहे, हे आपल्याला नुकत्याच राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेतून समजतं. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील शाळेत इंदूर मेघवाल या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेर ठेवलेल्या माठातलं पाणी प्यायल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चवदार तळ्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब. आपल्या भारताच्या पंचाहत्तराव्या अमृतमहोत्सवी वर्षीसुद्धा हे घडत आहे. जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा वाटतं, की राज्यघटनेतील समानतेचं मूल्य अजून किती खोलवर रुजवायचं बाकी आहे आणि ते शिक्षणाचाच पाया भक्कम करण्यासाठी किती गरजेचं आहे, यावरच मुलांच्या प्रगतीचा सारा डोलारा अवलंबून आहे. माणूस म्हणून त्यांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी या मूल्यांची जोपासना फार महत्त्वाची ठरते. २१ व्या शतकातील शिक्षण याची मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतील मूल्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
(लेखक शिक्षण अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.