येवला (जि.नाशिक) : येथील पालिकेचे राजकारण म्हणजे भल्याभल्यांना न कळणारे कोडे असते. अर्थात, गेली साडेचार वर्ष या राजकारणाची झलक फारशी दिसली नाही, ती सरतेशेवटी दिसू लागली आहे. प्रभारी नगराध्यक्षपदाच्या राजकारणावरून नगराध्यक्षाच्या विरोधातील सुप्त नाराजी उघड झाली असून, सध्या सर्वपक्षीय नगरसेवकांची झालेली एकजूट व एकटे असलेले नगराध्यक्ष हे चित्र शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. (battle-in-election-yeola-Municipality-nashik-marathi-news)
प्रभारी निवडीवरून नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक संघर्ष
डिसेंबरमध्ये नगराध्यक्षपदाची मुदत संपत असल्याने नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. पाच वर्षांपूर्वी येथील आमदार तथा पालकमंत्री छगन भुजबळ तुरुंगात असल्याने त्या वेळी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने भाजपचे बंडू क्षीरसागर नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक दहा, शिवसेनेचे पाच, भाजपचे चार व अपक्ष पाच नगरसेवक निवडून आले होते. आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने क्षीरसागर यांना लॉटरी लागली. तर त्याचवेळी उपनगराध्यक्षपदी आमदार किशोर दराडे व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या माध्यमातून दराडे समर्थक सूरज पटणी यांची वर्णी लागली होती. त्यानंतर पालिकेच्या राजकारणात उपनगराध्यक्ष व नगरसेवक फारसे रमले नाही. नगराध्यक्ष या नात्याने क्षीरसागर यांनीही नगरसेवकांना विशेष काही महत्त्व दिले नाही. त्यामुळे सुप्त नाराजी अधूनमधून दिसत होती. आता ती प्रखरपणे उघड झाल्याचे प्रभारी नगराध्यक्ष निवडीवरून स्पष्ट झाले आहे.
नगरसेवकांच्या बैठक पे बैठक
क्षीरसागर यांनी रजेवर जाऊन या काळात उपनगराध्यक्ष पटणी यांना प्रभारी अध्यक्ष पद द्यावे, अशी चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. अगोदर क्षीरसागर यांनी यासाठी होकारही दर्शविला; मात्र नंतर पक्षश्रेष्ठींना विचारून निर्णय घेतो म्हणत नकळतपणे नकार दाखविला. त्यामुळे नाराज नगरसेवकांच्या बैठक पे बैठक होऊन सर्वांनीच एकत्रितपणे काम करण्याचे ठरले.
शहर पाणीटंचाईचा सामना करत असल्याने व जलशुद्धीकरण केंद्रात अनेक त्रुटी असल्याने अध्यक्षांना डावलून सर्वपक्षीय नगरसेवकांनी तेथे जाऊन पाहणी करत प्रशासनाची कानउघडणी केली. येथूनच हे नाराजीनाट्य सुरू झाले. त्यानंतर पालखेड डाव्या कालव्याचे पाणी शहराच्या पाणीयोजनेच्या साठवण तलावात येताच नगराध्यक्षांना डावलून सर्वपक्षीय नगरसेवक जलपूजनासाठी उपस्थित राहिले. यामुळे ही चर्चा अधिकच रंगली. आता तर या आठवड्यापासून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांना डावलून बांधकाम, स्वच्छता, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाच्या बैठका घेण्याचे ठरले आहे. या बैठकांना सुरवातही झाली असून, अध्यक्ष या सर्व प्रक्रियेपासून दूर आहेत. किंबहुना साठवण तलावात आलेले पाणी पाहण्यासाठी क्षीरसागर यांना एकट्याला जाण्याची वेळ आल्याचे सोशल मीडियातून दिसले. यामुळे पालिकेतील हे नाराजीनाट्य अधिकच रंगतदार होताना दिसत आहे. भरीस भर म्हणून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यातही दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याने नगराध्यक्षांना आता सध्या राजकीय साडेसातीतून जावे लागत असल्याचे चित्र आहे.
आगामी निवडणुका रंगतदार होणार, हेही तितकेच खरे!
लवकरच मर्चंट बँक, पालिका, बाजार समिती आदी संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार असून, त्या अगोदरच रंगलेले हे नाराजीनाट्य येथील नव्या राजकारणाची नांदी तर ठरणार नाही ना, अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे. त्यातच यावेळच्या निवडणुकीत भुजबळांचीही एन्ट्री असल्याने आगामी निवडणुका रंगतदार होणार, हेही तितकेच खरे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.