दाभाडी (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थींना चार महिन्यापासूनचे अनुदान अदा झालेले नसल्याने विधवा, वृद्ध, अपंग, निराधारांची दिवाळी यंदा अंधारात राहणार आहे. शासनाने निर्गमित केलेल्या अध्यादेशान्वये लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले मुदतीत सादर केले नाहीत. या आदेशाचा फटका तालुक्यातील तब्बल तीस हजार लाभार्थ्यांना अनुदानापासून मुकावे लागण्याची गंभीर बाब समोर आली आहे.
लाभार्थी चार महिन्यांपासून अनुदानापासून वंचित
मालेगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्धापकाळ निवृत्ती योजना, विधवा निवृत्ती योजना, राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजनेचा लाभार्थ्यांना मासिक वेतन देण्यात येते. तालुक्यातील ग्रामीण भागातील जून महिन्याअखेर पंधरा विविध योजनांतर्गत २९ हजार ४९१ लाभार्थी पात्र तर शहरी भागात २० हजार ५१२ लाभार्थी पात्र होते. मात्र राज्य शासनाने राज्यातील लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करण्याचे आदेश (३ मे रोजी) बजावल्याने लाभार्थींनी दाखले जमा केले. परंतु या आदेशास कोरोना व अन्य कारणांमुळे लाभार्थ्यांकडून थंड प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील १७ हजार १३९ तर शहरी भागातील २ हजार ८०३ लाभार्थी वंचित झाले आहेत. शहरी व ग्रामीण भागातील तब्बल ४० टक्के लाभार्थी वंचित झाले आहेत. ही बाब तालुका कार्यालयांकडून दिवाळीच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचे अनुदान वितरण करताना समोर आली आहे. तालुक्यातील लाभार्थी चार महिन्यापासून अनुदानापासून वंचित आहेत.
निराधारांवर दुहेरी संकट
हयातीच्या दाखल्या अभावी शहर व तालुक्यात तब्बल १९ हजार ९४२ लाभार्थ्यांना अपात्र झाले आहेत. हयातीचा दाखला सादर होईपर्यंत लाभार्थ्यांचे गतकाळातील अनुदानही बुडीत होणार आहे. ही बाब आर्थिक नाकेबंदी करणारी ठरत आहे. ग्रामीण भागात दिवाळीनंतरच अनुदान अदा होणार असल्याने या उपेक्षित वर्गाची दिवाळी अंधारातच जाणार आहे. आता या वंचित घटकांना दिवाळीनंतर हयात दाखल्यांसाठी वणवण आणि गत अनुदान बुडीत होण्याच्या दुहेरी संकटाने निराधारांच्या सणावर अंधार अधिक गडद बनू पाहत आहे. दरम्यान अनुदानापासून वंचितांच्या सरबत्तीला तोंड देताना आगामी काळात तालुक्यातील बँक शाखांची डोकेदुखी वाढणार आहे.
क्र.--योजना नाव--शहरी लाभार्थी संख्या--वंचित संख्या--ग्रामीण लाभार्थी संख्या--वंचित संख्या
१)श्रावणबाळ योजना--७,३५३--६७२--१९,३९१--१०,२५३
२)संजय गांधी निराधार योजना--३,६९३--१,०३६--४,५३०--३,०५९
३)राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना--५,२२५--१,००९--५,४८२--३,८२७
४)राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना--१,३९३--७९--८३--००
५)राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना--४५--०७--०५--०५
''लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले शहर ग्रामीण कार्यालयात तत्काळ सादर करावेत. शासन आदेशानुसार कार्यवाही क्रमप्राप्त असल्याने नागरिकांनी कागदपत्रे सादर करावीत.'' - चंद्रजित राजपूत, तहसीलदार, मालेगाव
''अनुदानाची वाट पाहत चार महिने लोटले. सरकारच्या चालढकलीमुळे आम्ही जगायचे कसे. अनुदान लवकर मिळायला हवे.'' - सुरेश ठाकरे, लाभार्थी, दाभाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.