नाशिक : आठवड्यावर आलेल्या दिवाळीमुळे बाजारात खरेदीदारांबरोबरच व्यावसायिकांत मोठ्या उत्साहाने वातावरण आहे. या गर्दीचा लाभ उठवत खरेदीसाठी आलेल्या अनेकांना भुरट्या चोरट्यांनी मोठा दणका दिल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर इतरांचे नुकसान टाळावे, म्हणून आप्तस्वकियांसह शेजारपाजाऱ्यांकडून खरेदीसाठी जाणाऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
फसवणूकीमध्ये पुरूषांपेक्षा महिलांची संख्या मोठी
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह शालिमार, कानडे मारुती लेन, रविवार पेठ या भागात दिवाळी खरेदीसाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचंड गर्दी उसळत आहे. या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी भुरट्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांकडून अनेकांच्या महागड्या मोबाईलसह रोख रक्कम, महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती ‘लक्ष्य’ करण्यात आल्या आहेत. अशी झळ बसलेल्या अनेकांकडून खरेदीसाठी जाणाऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांची संख्या मोठी आहे.
चोरांच्या टोळ्या सक्रिय, पोलिसांसमोर मोठे आव्हान
काही दिवसांत मेनरोडसह गर्दीच्या ठिकाणी महिलांनी गळ्यातील पोतींसह पर्स, मोबाईल व पैसे गमावले आहेत. त्यातील अनेकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारही न केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या चोरी करणाऱ्यांच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
हे चोरटे संघटित स्वरूपात चोऱ्या करत असल्याने रंगेहात पकडणे अवघड बनले आहे. कारण एखाद्या व्यक्तींचा मोबाईल किवा पाकीट चोरल्यावर ते काही क्षणात दुस-याकडे ‘पास’ केले जाते. त्यामुळे चोरी करणारा नामनिराळा राहतो. एखाद्याला चोरी झाल्याचे लक्षात आले तरी पुरावा राहात नसल्याने यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सद्या मेनरोड, शालिमार भागात तर पाय ठेवायलाही जागा नसते, याच परिस्थितीचा फायदा हे चोरटे उठवत असल्याचे दिसून येते.
आठवडे बाजारातही चोरटे सक्रिय
जवळपास दीड वर्षापासून प्रशासनाने गंगाघाटावरील बुधवारच्या आठवडे बाजारास कोरोनाच्या धास्तीने मज्जाव केला होता. परंतु गत महिन्यापासून हा बाजार पुन्हा बहरू लागला असून खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. याचा फायदा उठवत महिलांच्या पोतींसह मोबाईल, रोख पैसे लंपास केले जात आहे. विशेष म्हणजे काही भाजीविक्रेत्यांनाही हे चोरटे चांगलेच परिचित झाले आहेत, ते भाजी घेणाऱ्यास काळजी घेण्याचा सल्लाही देत आहेत. पोलिसांचे गस्तीपथक कार्यरत असूनही चोरट्यांना अटकाव होत नसल्याचे चोरट्यांचे फावत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.