नाशिक : गणेशोत्सव नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. शासन कुणाच्याही श्रद्धेच्या आड येणार नाही; पण कोरोनाचे संकट घोंगावत असताना गणेशोत्सवानिमित्त गर्दी होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी अडवणूक होणार नाही. तसेच, सणासुदीच्या काळात वाढीव निर्बंध लादण्याचाही सरकारचा विचार नाही, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी (ता. ४) कोरोना आढावा बैठक झाली. त्यानंतर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह आरोग्याधिकारी बैठकीला उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की महिनाभरात कोरोनाची रुग्णसंख्या शंभरने घटली आहे. कोरोनाचा संसर्गदर २.८ टक्के, तर मृत्युदर २.११ टक्के आहे. म्युकरमायकोसिसचे जेमतेम २७ रुग्ण आहेत. याशिवाय लसीकरणही ३२ टक्क्यांहून ३६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. कोरोनाचा प्रभाव घटत असल्याची ही लक्षणं आहेत. अशा स्थितीत गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय असल्याने, शासनाचा कोरोनाचे निर्बंध वाढविण्याचा विचार नाही. त्यामुळे गणेशोत्सवात पोलिसांकडून नियमानुसार परवानग्यांसाठी अडवणूक होणार नाही. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढून कोरोनाचा शिरकाव वाढणार नाही, याची नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.
ऑक्सिजनचे नियोजन
तिसऱ्या लाटेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४०० टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ३५० टनची सोय झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत आणखी १०० टन ऑक्सिजनचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे महिनाअखेर जिल्ह्यात ४५० टन ऑक्सिजन असेल.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती
सक्रिय रुग्ण ९७८
लसीकरण ३६ टक्के
संसर्गदर २.०८
मृत्युदर २.११
म्युकरमायकोसिस २७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.