Chhagan Bhujbal News : राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ संपले, असे अनेकदा झाले. परंतु पुन्हा उसळी घेऊन भुजबळ उठले... लढले अन् जिंकलेही, तीच स्थिती मराठा आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनातून दिसून येत आहे. काही वर्षांपासून भुजबळ यांना राजकीय क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
त्या सामन्यात काहीशी माघारही घ्यावी लागल्याने भुजबळांच्या वयाचा व घटत्या राजकीय वजनाचा आधार घेत अनेक जण ‘भुजबळ संपले’ असे म्हणत असतानाच आता पुन्हा एकदा ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी हाक त्यांनी दिल्याने भुजबळांचे ओबीसी राजकारण जोर धरत आहे.
परंतु दुसऱ्या बाजूला ओबीसी मतांसाठी आसुसलेल्या भाजपला भुजबळांच्या या खेळीचा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. (bhujbal statement about maratha reservation in obc is benefit to bjp nashik news)
मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यास विरोध केला होता. त्या विरोधाला विरोध करत छगन भुजबळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर ओबीसींचे मसिहा म्हणून भुजबळ यांचा चेहरा समोर आला. त्यानंतर ओबीसी अंगाने भुजबळ यांचे राज्यात राजकारण बघायला मिळाले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे फारसा मोठा विषय नव्हता.
त्यांना झालेली अटक तसेच लोकसभा व नांदगाव विधानसभेतील पुतण्या समीर व मुलगा पंकज यांचा पराभव त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात फारसे महत्त्व नसलेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदामुळे भुजबळांना राज्याच्या राजकारणातून ‘साइड ट्रॅक’ केले जात असल्याचे बोलले गेले. महायुतीत अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरही त्यांचेकडे दमदार असे खाते दिले न गेल्याने फक्त राजकीय आश्रयासाठी भाजप सोबत युती झाल्याचे बोलले गेले.
या सर्व घडामोडींत भुजबळांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. परंतु मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारने माघार घेत २ जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर भुजबळ यांना नवा मुद्दा मिळाला. जरांगे-पाटील यांच्या उपोषणादरम्यान काही आमदारांच्या मालमत्तेची तोडफोड, जाळपोळ झाल्याने त्यांच्या घरांना भेटी देत भुजबळ यांनी बीड येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सरकारलाच घरचा आहेर दिला.
भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. पुन्हा एकदा ओबीसी हा मुद्दा घेऊन भुजबळ मैदानात उतरले. वास्तविक भुजबळ यांची चारही बाजूने कोंडी करण्याची संधी भाजपने सोडलेली नाही. परंतु आता ओबीसी हा मुद्दा घेऊन भुजबळ पुन्हा राजकीय आखाड्यात उतरल्याने भाजपसाठी देखील ओबीसींप्रमाणेच भुजबळ मसिहा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याला कारण म्हणजे ओबीसींची मते भाजपला हवी आहेत. परंतु मराठा-ओबीसी जोडण्याच्या राजकीय खेळीत भाजपला ते जमत नव्हते. मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणावरून आंदोलन व भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा सरकारला दिलेला इशारा या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना ओबीसींची सहानुभूती मिळणार आहे. त्यातूनच भाजपसाठी भुजबळ मसिहा ठरणार असून, भुजबळांची खेळी भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेच मैदान, तेच गुरू-शिष्य
मंडल आयोगाचा निर्णय झाल्यानंतर ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, याचे समर्थन शरद पवार यांनी जालन्याच्या मैदानावर केले होते. आता त्याचं मैदानावरून भुजबळ पुन्हा ओबीसी आरक्षणासाठी लढा देणार आहेत. त्यामुळे या अंगानेदेखील भाजप भुजबळ यांच्या लढाईकडे पाहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.