मालेगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या वसुलीविरोधात येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेले बिऱ्हाड मोर्चा आंदोलन शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर सरळ व्याजाने आठ टक्के व्याज आकारून एकरकमी तडजोड करण्याचे, सक्तीची वसुली थांबविण्याचे, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेच्या नावे झाल्या आहेत
त्यांना स्थगिती देऊन एकरकमी तडजोडमध्ये येण्याची संधी देण्याचे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्याने स्वाभिमाने शेतकरी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा आंदोलन सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेसातला मागे घेण्याची घोषणा स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. सरकारने आश्वासन पाळले नाही तर १६ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या दारात बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, सहकारमंत्र्यांनी लेखी आश्वासन न दिल्याने आंदोलनकर्त्यांमधील शेतकरी संघटनेचा एक गट आंदोलनावर ठाम आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे-पाटील व महिला आघाडीच्या सीमा नरवडे यांचे समर्थक आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत संघटनेचा निर्णय झालेला नव्हता. स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मात्र आंदोलनातून काढता पाय घेतला.
जिल्हा बँकेने बँकेवर दरोडा घालणाऱ्या धनदांडग्यांची कर्जवसुली करावी, शेतकऱ्यांची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, एकरकमी परतफेडीसाठी सवलत द्यावी, सहा ते आठ टक्के व्याजाने थकीत कर्ज भरून घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेतर्फे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
तत्पूर्वी श्री. भुसे यांनी रविवारी नाशिक येथील संपर्क कार्यालयात श्री. शेट्टी व शेतकऱ्यांशी चर्चा करून सहकारमंत्र्यांना यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. चर्चा निष्फळ ठरल्याने आज दुपारी आंदोलनाला सुरवात झाली. महामार्गावरील मनमाड चौफुलीपासून जुन्या महामार्गाने आंदोलनकर्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ आले.
श्री. भुसे यांच्या निवासस्थानासमोर जागा नसल्याने पोलिसांनी बॅरिकेडिंग करून आंदोलनकर्त्यांना अडवले. सोयीसाठी पोलिस कवायत मैदानावर आंदोलन करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिस कवायत मैदानावर दुपारपासून रात्री साडेसातपर्यंत ठिय्या मांडला. यादरम्यान संघटनेचे पदाधिकारी, सुकाणू समिती व शेतकऱ्यांदरम्यान दोन वेळा बैठक झाली. नेमका काय निर्णय घ्यावा, याबद्दल एकमत होऊ शकले नाही.
यादरम्यान बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, माजी उपमहापौर नीलेश आहेर यांनी पालकमंत्री श्री. भुसे यांच्याशी संपर्क साधत श्री. शेट्टी व आंदोलनकर्त्यांचे आंदोलनस्थळी स्पीकरवर बोलणे करून दिले. सहकारमंत्री श्री. सावे यांनी मागण्या मान्य केल्या असून, त्याचा पाठपुरावा आपण करू, आंदोलन मागे घ्यावे, असे आश्वासन श्री. भुसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या भूमिकेला शेतकरी संघटनेच्या एका गटाने विरोध दर्शविला. ही लढाई आर-पारची असून, लेखी आश्वासन हवे या भूमिकेवर ते ठाम होते. आंदोलनात श्री. शेट्टी, श्री. डहाळे, अर्जुन बोराडे, अनिल धनवट, सीमा नरवडे, संदीप जगताप, खेमराज कोर, शेखर पगार, बिंदूशेठ शर्मा, वसंतराव कावळे, संतोष रहेरे, भोजराज चौधरी, गंगाधर निखारे, प्रशांत कड, बापूसाहेब महाले आदींसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
"जिल्ह्यातील शेतकरी आर-पारची लढाई घेऊन रस्त्यावर आले. दोन महिने शासनाने दखल घेतली नाही. दोन दिवसांपूर्वी दखल घेतली. कालपासून बिऱ्हाड आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे लक्षात आल्यानंतर चक्र फिरायला सुरवात झाली. जिल्हा बँकेवर दरोडा घालणारे नामानिराळे आहेत. शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. धनदांडग्यांना विनंती व शेतकऱ्यांवर कारवाई हे खपवून घेणार नाही. सहकारमंत्र्यांनी श्री. भुसे यांच्या माध्यमातून आश्वासन दिले आहे. सरकारने दिलेले शब्द पाळले नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर १६ फेब्रुवारीला ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या दारात सर्व शेतकरी धडकणार."
- राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी संघटनाप्रमुख
क्षणचित्रे
- खासदार राजू शेट्टींसह बिऱ्हाड मोर्चासाठी आलेल्या प्रमुख नेत्यांचे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
- पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भोजनाची केली व्यवस्था
- प्रारंभी एक हजार शेतकरी आंदोलनकर्त्यांना पुरी, भाजी, मसालेभाताची मेजवानी
- आंदोलनकर्ते वाढल्याने नव्याने मसालेभात वाटप
- आंदोलनकर्त्यांमध्ये प्रारंभी उत्साह, सायंकाळी उत्साह मावळला
- आंदोलनकर्त्यांमध्ये शेतीकामांची व वातावरणाची चिंता
- आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयावरून आंदोलनकर्त्यांमध्ये फूट
- पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.